सेनेचे आता ‘जय बांगला’!; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 01:22 AM2021-01-18T01:22:45+5:302021-01-18T06:59:05+5:30
‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात दाखल होऊ.
मुंबई :पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय रणधुमाळी सुरू आहे. बंगालच्या या रणधुमाळीत आता शिवसेनाही ‘जय बांगला’ म्हणत शड्डू ठोकणार आहे. शिवसेनापश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली.
‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात दाखल होऊ. जय हिंद, जय बांगला’ असे ट्विट करत संजय राऊत यांनी बंगाल निवडणुकांची घोषणा केली. शिवसेना बंगालच्या रणधुमाळीत उतरणार असली, तरी नेमक्या किती ठिकाणी उमेदवार उतरवणार, उद्धव ठाकरे प्रचारासाठी बंगालमध्ये जाणार का, याबाबत कोणताही तपशील संजय राऊत यांनी दिलेला नाही.
यापूर्वीच्या लढती -
- यापूर्वी शिवसेनेने उत्तर प्रदेशसह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आदी राज्यांत निवडणुक रिंगणात उमेदवार उतरविले होते.
- अलीकडेच झालेल्या बिहार विधानसभा निवडणूकीत धनुष्यबाण चिन्हावरून वाद झाल्याने तुतारी वाजविणाऱ्या मावळ्याचे चिन्ह घेऊन शिवसेनेने २२ उमेदवार दिले होते. मात्र, एकाही जागी शिवसेनेला डिपाॅझिटही राखता आले नाही.