Maharashtra Election 2019 : शिवसेनेने दहा रुपयांत जेवण योजना परस्परच जाहीर केली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 05:40 AM2019-10-17T05:40:51+5:302019-10-17T05:42:03+5:30
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नाराजी
अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दहा रुपयात जेवण आणि एक रुपयात आरोग्य तपासणी ही शिवसेनेची योजना आमच्याशी चर्चा करुन केली असती तर ती व्यापक स्वरुपात भाजपने देखील आपल्या जाहीरनाम्यात मांडली असती. मात्र, त्यांनी तसे विचारले नाही. अर्थात, ती त्यांची भूमिका आहे. त्यावर मी जास्त बोलणे योग्य नाही, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.
एकनाथ खडसे यांचे
तिकीट का कापावे लागले?
मागच्या काही प्रकरणानंतर खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याची चौकशी सुरु आहे. प्रकरण न्यायालयात आहे. पण हा सगळा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आणि राष्टÑीय अध्यक्षांचा आहे. त्यावर तेच जास्त चांगले सांगू शकतील. मात्र, खडसे यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांना डावलले असा त्याचा अर्थ होत नाही.
शिवसेनेने आपलाच मुख्यमंत्री
होणार असे सांगणे सुरु केले
आहे. तुम्ही याकडे कसे पाहाता?
शिवसेना युतीमध्ये असली तरी तो स्वतंत्र पक्ष आहे. काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा स्वत:चा प्रश्न आहे. मात्र, निकालानंतर काय होणार, हे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ठरले आहे. आणि जसे ठरले आहे तसेच होणार आहे.
शिवसेनेने दहा रुपयात जेवण
आणि एक रुपयात आरोग्य
तपासणी अशी घोषणा केली
आहे, ती तुम्हाला मान्य आहे का?
आम्हाला विश्वासात घेऊन ही घोषणा करायला हवी होती. आम्ही दोघे युतीमध्ये आहोत, सरकारमध्ये आहोत, तेव्हा त्यांनी चर्चा करुन घोषणा केली असती तर अधिक चांगले झाले असते. मात्र, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांची भूमिका वेगळी असू शकते.
शरद पवार यांच्यावर ईडीची
कारवाई झाल्यानंतर
पवारांविषयी राज्यभर सहानुभूती
निर्माण झाली. मोठ्या प्रमाणावर
तरुण रस्त्यावर उतरला, ही
कारवाई करण्याची राजकीय चूक
झाली असे वाटते का?
ही राजकीय चूक नाही. न्यायालयाच्या माध्यमातून आलेल्या आदेशाचे पालन आहे. पीआयएल मध्ये झालेल्या तक्रारीत शरद पवार यांचे नाव होते. त्याअनुषंगाने न्यायालयाचे आदेश आले, त्यात सरकार आले कुठे? मी राज्यभर फिरत आहे. या घटनेचा राष्टÑवादीला किंवा शरद पवार यांना फायदा होत आहे, असे मला कुठेही दिसत नाही. काडीचाही संबंध वाटत नाही.
भाजपमध्ये आलेले उदयनराजे
यांना तुम्ही लोकसभेची उमेदवारी
दिली आहे. मात्र, ते अडचणीत
असल्याची चर्चा आहे. त्यांची
जागा निवडून येणार नाही, असे
सांगितले जाते. त्यांना भाजपमध्ये
घेणे चूक झाली असे वाटते का?
अजिबात नाही. निकालावरुन लोकांना कळेलच. उदयनराजे
निवडून येणारच आहेत. त्यांची लोकप्रियता तशीच आहे. ते मागच्या वेळेपेक्षाही चांगल्या मतांनी निवडून येतील.
तुम्ही राज्यभर फिरत आहात,
निवडणुकीच्या प्रचारात तुमचा
दिनक्रम नेमका कसा असतो?
शेड्यूल असे राहिलेले नाही. सकाळी उठल्यापासून रात्री उशीरापर्यंत भेटीगाठी, बैठका, प्रचाराचे नियोजन यात वेळ कसा जातो, ते कळत नाही. अनेकदा जेवणही वेळच्या वेळी मिळत नाही. २४ तासात फार तर ३ ते ४ चार झोप मिळते. प्रत्येक ठिकाणी आम्ही गेले पाहिजे, असे वाटते. बंडखोरांची नाराजी कमी करणे, यासाठी खूप वेळ द्यावा लागतो.
या पाच वर्षाच्या काळात कायम
लक्षात राहिलेले कोणते काम
तुम्ही सांगाल?
कामं अनेक आहेत. मात्र, सांगली, सातारा, कोल्हापूरला पूर आला तेव्हा सांगलीवाडी या गावी मी धावून गेलो. पाण्यातून जात असताना काही मगरी देखील तिथे होत्या. मात्र, मी आणि माझ्यासोबत तेथील पोलीस प्रमुख लोकापर्यंत पोहोचलो आणि त्यांना मदत देऊ शकलो. केरळला देखील वैद्यकीय पथक महाराष्टÑातून नेले. तेथेही मला मदत करता आली.
अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी मी अनेकदा मध्यस्थी केली, अशा अनेक आठवणी आज मनाला कायम लोकांसाठी धावून जाण्याचा धडा देत राहतो.
सार्वजनिक आरोग्य आणि
वैद्यकीय शिक्षण हे दोन
विभाग वेगवेगळे झाल्यामुळे
राज्यातल्या आरोग्य सेवेवर
परिणाम झाला आहे. हे दोन
विभाग एक असावे, असे
आपणास वाटते का?
तुम्ही म्हणता ते खरे आहे. ते दोन्ही विभाग एकमेकाशी संलग्न आहेत. दोन वेगळे विभाग असल्यामुळे फाईली फिरत राहतात. निर्णयांना विलंब होतो. वेळ जातो. म्हणून
दोन्ही खाती एक असावी, असे माझे मत आहे. माजी आरोग्य मंत्री
दीपक सावंत यांचीही तीच
भूमिका होती. नव्या सरकारमध्ये देखील मुख्यमंत्र्यांना यासाठी
आग्रही भूमिका घेईल. कोणाकडेही हे खाते असावे. पण ते एकाकडेच असावे.
आपल्या काळात नाशिकमध्ये महिंद्राचा प्रकल्प आला. मात्र, आता महिंद्राने ४० टक्के उत्पादन कमी केले आहे. उद्योग क्षेत्रात वातावरण चिंतेचे आहे. त्याविषयी काय सांगाल?
महाराष्टÑात काही ठिकाणी मंदीचे वातावरण दिसत आहे. महिंद्राचे लोकही माझ्याकडे आले होते. खूप गाड्या पडून आहेत. त्यांना मार्केट नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण ही इथेच आहे असे नाही. देशभरात हे चित्र आहे. मात्र, बाहेरच्या देशापेक्षा आपण खूप सुखी आहोत. थोड्याच कालावधीत यातून मार्ग निघेल. नाशिकमध्ये लेबर प्रॉब्लेम आहे, हे मान्य आहे. लवकरच त्यावर तोडगा निघेल. उद्योग आणि कामगार संघटना दोघांमध्येही अडचणी आहेत. संघटनांनी उद्योग बंद पडतील, अशी अडेलतट्टूपणाची भूमिका घेतली तर कसे चालेल. दोघांमध्ये समन्वय साधून मार्ग निघाले पाहिजे.