तुला बघतोच आता...; भास्कर जाधव आणि राम कदम सभागृहातच भिडले, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 20:19 IST2025-03-05T20:17:50+5:302025-03-05T20:19:29+5:30
राम कदम यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव यांचा पारा चढला.

तुला बघतोच आता...; भास्कर जाधव आणि राम कदम सभागृहातच भिडले, नेमकं काय घडलं?
Bhaskar Jadhav: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप आमदार राम कदम यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना काळातील कामगिरीवरून लक्ष्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते भास्कर जाधव भलतेच आक्रमक झाले. "तुला बघतोच आता," असं म्हणत भास्कर जाधव यांनी आमदार कदमांवर शाब्दिक हल्ला चढवला.
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे एवढीच मागणी केली होती की, मुंबईतील व्हेंटिलेटरची संख्या वाढवा. पण त्यांनी ती वाढवली नाही. व्हेंटिलेटरची संख्या वाढवली असती तर या मुंबईत कोरोना काळात ११ हजार लोकांचे मुडदे पडले नसते. पण उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं की उभा राहून बोललंच पाहिजे, असा दबाव उबाठा गटातील लोकांवर आहे," अशी टीका आमदार राम कदम यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव यांचा पारा चढला.
राम कदमांवर पलटवार करताना भास्कर जाधव म्हणाले की, "राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन अनेक आरोप केले. पण ज्या व्यक्तीला या सभागृहात येऊन आपल्यावरील आरोपांना उत्तर देता येत नाही, त्यांचा नामोल्लेख करायचा नसतो, ही प्रथा आहे की नाही? हा नियम आहे की नाही? हे पावित्र्य पाळलं गेलं का?," असे प्रश्न आमदार जाधव यांनी उपस्थित केले. मात्र जाधव यांचं भाषण सुरू असतानाच पुन्हा राम कदम बोलण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर भडकलेल्या भास्कर जाधवांनी थेट "बघतोच तुला आता" असं म्हणत राम कदमांना आक्रमक इशारा दिला.
"कधीकधी आपण आपल्या नेत्याची इतकी चापलुसी करतो, इतकी हांजीहांजी करतो आणि त्यातून आपल्याला वाटतं की आपले नेते खूश होतील. पण यातून आपण आपल्याच नेत्याची प्रतिमा खराब करत असतो," असा टोलाही यावेळी भास्कर जाधव यांनी आमदार कदम यांना लगावला.