Maharashtra Political Crisis: “राज्यपाल कोश्यारी म्हणजे घरगडी आहेत”; टीका करताना शिवसेना नेत्याची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 08:50 AM2022-08-06T08:50:33+5:302022-08-06T08:52:08+5:30
Maharashtra Political Crisis: प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करताना भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष कसा वाचवणार, अशी विचारणा शिवसेना नेत्याने केली आहे.
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचा रखडलेला विस्तार, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आणि राज्यपालांचे मराठी भाषिकांविरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद यांमुळे राज्याचे राजकारण आताच्या घडीला चांगलेच तापले आहे. यातच शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीका करताना जीभ घसरल्याचे सांगितले जात आहे. राज्यपाल हे घरगडी आहेत, अशी आक्षेपार्ह टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
राज्यपाल कोश्यारींनी मराठी माणसांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरुन लक्ष हटवण्यासाठी संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना संजय राऊत यांनी पत्र लिहिले होते. ५ ऑगस्टपर्यंत ईडीकडे मुदत मागितली होती. अधिवेशन संपल्यानंतर ७ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचेही सांगितले होते. पण राऊतांच्या पत्राला कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच ईडीने त्यांच्यावर कारवाई केली, असे भास्कर जाधव म्हणाले.
अशा माझ्या शुभेच्छा आहेत
देशात भाजपकडून दडपशाही सुरु आहे. राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊच नये. त्याची गरजच नाही. आता लोकांना लोकशाही काय आहे, ते समजले. बिनखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस सर्व कार्यक्रम भाजपचेच राबवतायत. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार न होता भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम राबवला जावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत, असा टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला. यापुढील शिवसेनेची लढाई खुल्या मैदानात होईल. एकाने दुसऱ्याला गिळावे, दुसऱ्याने तिसऱ्याला गिळावे हाच जगाचा न्याय खरा, हीच जगाची परंपरा, तू जपून टाक पाऊल जरा, तू जपून टाक पाऊल जरा, असेही जाधव म्हणाले. प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करताना भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष कसा वाचवणार? असा रोकडा सवालही भास्कर जाधव यांनी केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीला गेले. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी या पार्श्वभूमीवर दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारीसुद्धा दिल्लीत आहेत.