Shiv Sena: उद्धव ठाकरेंना जबर धक्का, १४ खासदारांची शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 04:16 PM2022-07-18T16:16:25+5:302022-07-18T17:39:48+5:30
Shiv Sena: शिवसेनेच्या लोकसभेतील खासादारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने जाणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहे. आज शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेच्या १४ खासदारांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचे समोर येत आहे.
मुंबई - एकनाथ शिंदे यांनी बंड करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आधी शिवसेनेच्या ४० खासदारांनी, तसेच विविध मनपा आणि नगरपालिकांमधील आजीमाजी नगसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता शिवसेनेच्या लोकसभेतील खासादारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने जाणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहे. आज शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेच्या १४ खासदारांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचे समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदारांच्या गटाने काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १४ खासदारांनी हजेरी लावल्याचे वृत्त समोर आले आहे. शिवसेनेचे १४ खासदार शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने हजर राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, असा आग्रह केला होता. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान, खासदारांची नाराजी थोपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. मात्र आता शिवसेनेच्या १४ खासदारांनी थेट शिंदे गटाच्या बैठकीला हजेरी लावल्याने उद्धव ठाकरे यांना अजून मोठा धक्का बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.