शिवसेना-भाजपामधील युती निश्चित? जागावाटपही ठरलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 08:06 AM2019-02-16T08:06:14+5:302019-02-16T08:10:46+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये युती होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर तोडगा निघाल्याचे संकेत मिळत आहे.
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये युती होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर तोडगा निघाल्याचे संकेत मिळत असून, लोकसभेमध्ये शिवसेना 23 तर भाजपा 25 जागांवर लढण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी 144 जागा लढण्याचा फॉर्म्युला ठरल्याचे वृत्त आहे. दरम्यान, येत्या दोन तीन दिवसांत भाजपाध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर येऊन बोलणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर जाऊन लोकसभा निवडणुकीतील भाजपा-शिवसेना युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असून भाजपा २५ तर शिवसेना २३ जागा लढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. तसेच विधानसभेसाठी प्रत्येकी 144 जागांवर लढण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. तसेच पालघरची जागा आपल्याला देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला भाजपाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही जागा शिवसेनेला सोडल्याचे वृत्त आहे.
2014 साली केंद्रात एकहाती सत्ता आल्यानंतर भाजपाने दिलेली दुय्यम वागणूक आणि राज्यात सातत्याने शिवसेनेचे खच्चीकरण करण्याची घेतलेली भूमिका यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर भाजपाने शिवसेनेविरोधात आग्रमक धोरण स्वीकारले होते. मात्र राष्ट्रीय पातळीवर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपाला दोन पावले मागे घेत शिवसेनेशी युतीसाठी बोलणी करावी लागली होती.