Maharashtra Election 2019 : मोठा-छोटा भाऊ यांच्यातील काटशह निर्णायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 06:16 AM2019-10-17T06:16:54+5:302019-10-17T06:19:33+5:30

शिवसेना-भाजपला बंडखोरीची लागण; राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे साथसाथ तर, कणकवलीत युतीमध्ये थेट लढत

shiv sena bjp on big brother move; but got rebellion's fight | Maharashtra Election 2019 : मोठा-छोटा भाऊ यांच्यातील काटशह निर्णायक!

Maharashtra Election 2019 : मोठा-छोटा भाऊ यांच्यातील काटशह निर्णायक!

Next

महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच वर्षे मोठा आणि छोटा भाऊ यांच्यात वरचेवर जुंपलेली पाहायला मिळाली. आता कोकणाच्या लाल मातीत सत्ताधारी भाजप व शिवसेना हेच परस्परांना रोखण्याकरिता कशा खेळी करतात, यावर येथील निकाल अवलंबून असणार आहे. क्षीण झालेली काँग्रेस आणि फुटीने ग्रासलेली राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढत असल्याचे चित्र दिसत आहे.


ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास ठाणे शहरातील बहुतांश लढती प्रस्थापित नेत्यांनी आपल्याला अनुकूल करण्याकरिता आतून हातमिळवणी केल्याची कुजबुज आहे. एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक यासारखे बडे नेते रिंगणात आहेत. ठाणे शहर मतदारसंघात राष्ट्रवादीने मनसेच्या उमेदवाराकरिता माघार घेतल्याने ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात नवे मैत्रीपर्व सुरू होण्याची चर्चा आहे. अन्यत्रही ही छुपी युती डोके वर काढत आहे. कल्याण पश्चिम व पूर्व मतदारसंघात युतीमध्ये बेदिली आहे. कल्याण पश्चिम हा मतदारसंघ भाजपने शिवसेनेला सोडला खरा. मात्र, विद्यमान आ. नरेंद्र पवार यांनी बंडखोरी केली. लागलीच कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या धनंजय बोडारे यांनी बंड करून भाजपला खिंडीत गाठले. युतीत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात युतीमधील संघर्ष हीच डोकेदुखी आहे.


उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाशी हातमिळवणी करून भाजपने राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा खुंटीला टांगला. कलानी यांच्या स्नुषा पंचम यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीचा सोडलेला हात पुन्हा धरला व रिंगणात उडी ठोकली. आता कलानी यांचे राजकारण भाजप संपुष्टात आणणार का? ते येथील निकाल ठरवणार आहे.


एकेकाळी ठाणे जिल्ह्याचा भाग असलेल्या व सध्या स्वतंत्र जिल्हा असलेल्या पालघरमधील निवडणुकीतही भाजप-सेनेतील संघर्ष हाच प्रमुख मुद्दा आहे. येथील सहापैकी चार मतदारसंघ भाजपने शिवसेनेला सोडले आहेत. त्यामुळे बोईसरमध्ये भाजपच्या उपजिल्हाध्यक्षाने बंड केले आहे. नालासोपारा मतदारसंघात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी बविआचे क्षितिज ठाकूर यांना आव्हान दिले आहे. भाजप व बविआ यांनी छुपी हातमिळवणी करून पालघर जिल्ह्यात सेनेची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. सेनेच्या दृष्टीने महत्त्वाच्या पालघर, बोईसर मतदारसंघांत स्थानिकांचे बहिष्काराचे इशारे कटकटी वाढवणारे आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्या खेळीकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.


रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी श्रीवर्धनमधील अदिती तटकरे विरुद्ध विनोद घोसाळकर यांच्यातील लढत ही चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याकरिता ही लढाई प्रतिष्ठेची आहे. लोकसभा निवडणुकीत खुद्द तटकरे यांनी विजय प्राप्त केला. अदिती यांच्या विरोधात लढण्याकरिता मुंबईतून विनोद घोसाळकर यांना तेथे धाडण्यात आले. त्यामुळे ‘आयात’ उमेदवाराचा प्रश्न चर्चेत आला आहे. उरणमधील शिवसेनेचे मनोहर भोईर विरुद्ध शेकापचे विवेक पाटील यांच्यातील लढतीत भाजपच्या महेश बालदी यांच्या बंडखोरीमुळे या मतदारसंघाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. युतीमधील संघर्ष जसा उरणमध्ये दिसत आहे, तसाच तो अलिबागमध्ये भाजपच्या इच्छुकाला उमेदवारी न मिळाल्याने तेथेही असहकाराच्या रूपात दिसत आहे. अलिबाग व पेण मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवारांनी रिंगणात उडी ठोकून आघाडीच्या उमेदवारांची पंचाईत केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असाच संघर्ष पाहायला मिळणार आहे. दापोलीत शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम विरुद्ध संजय कदम यांच्यात संघर्ष आहे, तर गुहागरमध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले भास्कर जाधव यांचा सामना शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले सहदेव बेटकर हे करीत आहेत. लोकसभा निवडणुकीला सेनेला रत्नागिरी, राजापूर व चिपळूणमधून जवळपास दीड लाखांचे मताधिक्य लाभले. ही शिवसेनेकरिता जमेची बाजू असली तरी नाणार प्रकल्पावरून खा. विनायक राऊत व उद्योगमंत्री सुभाष देसाई हे सातत्याने भाजप व मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत असल्याने भाजपमध्ये नाराजी आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांपैकी एका जागेवर युतीमधील दोन्ही पक्ष उघडपणे विरोधात लढत आहेत. अर्थातची ती जागा कणकवलीतील नितेश राणे यांची आहे. लोकसभा निवडणुकीत केवळ कणकवलीत निलेश राणे यांना १० हजारांचे मताधिक्य प्राप्त झाले होते. स्थानिक पातळीवरील सत्ता राणे यांच्याकडेच आहे.
कोकणात भाजपकडे असलेली एकमेव जागा ही कणकवलीची असल्याने भाजपचे कार्यकर्ते आणि राणेंची यंत्रणा प्रचार करीत आहे. राणे यांचे विरोधक राज्यमंत्री दीपक केसरकर यांना राणे यांचेच एकेकाळचे कट्टर समर्थक राजन तेली यांनी आव्हान दिले असून तेही सध्या भाजपत आहेत. कोकणच्या भूमीत मोठा व छोटा भाऊ यांच्यातील शह-काटशह निर्णायक ठरणार आहेत.

दिग्गजांचे
भवितव्य पणाला

सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक, नरेंद्र मेहता, संजय केळकर, किसन कथोरे आदींचे भवितव्य पणाला लागले आहे. भाजपमधील बंडखोरीने मेहता यांची डोकेदुखी वाढवली आहे. पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध बविआचे हितेंद्र ठाकूर यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्यामुळे तटकरे व राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांची आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सिंधुदुर्गात नितेश राणे यांच्यामुळे नारायण राणे मैदानात उतरले आहेत.

Web Title: shiv sena bjp on big brother move; but got rebellion's fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.