मुंबईत शिवसेना, भाजपा तुल्यबळ!
By admin | Published: February 24, 2017 06:15 AM2017-02-24T06:15:02+5:302017-02-24T06:20:42+5:30
मुंबई महापालिकेत ८४ जागांसह शिवसेना नंबर एकचा पक्ष ठरला असला तरी त्याच्यापेक्षा केवळ दोनच
यदु जोशी / मुंबई
मुंबई महापालिकेत ८४ जागांसह शिवसेना नंबर एकचा पक्ष ठरला असला तरी त्याच्यापेक्षा केवळ दोनच कमी म्हणजे ८२ जागांवर यश मिळवित भाजपाने जोरदार यश संपादन केले. ठाण्याचा गड शिवसेनेने राखला असला तरी नागपूर, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, अमरावती, अकोला या सहा महापालिकांमध्ये भाजपाने बहुमत मिळविले. सोलापूर आणि उल्हासनगरमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष असून इतर पक्ष/अपक्षांच्या सहकार्याने सत्तेत येईल, अशी स्थिती आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपा आणि शिवसेनेची लढाई जवळपास बरोबरीत सुटली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या विकास आणि पारदर्शकतेच्या अजेंड्याला मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिला तर शिवसेनेने आपल्या परंपरागत मतदारांच्या आधारे यश मिळविले.
सकाळी शिवसेनेने निकालात आघाडी घेतल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला मात्र, दुपारनंतर भाजपाच्या एकेक जागा वाढत गेल्या आणि कमळ फुलू लागले. अंतिम निकालात दोघांमध्ये केवळ दोनचे अंतर राहिले. मिळाल्याने सत्तेचे समीकरण कसे असेल, भाजपा आणि शिवसेना एकत्र येतील या बाबत उत्सुकता आहे. अपक्षांना जवळ करण्याची रणनीती दोघांनीही आखली आहे.
गेल्यावेळी केवळ नागपूर महापालिकेत भाजपाकडे सत्ता होती. यावेळी सहा महापालिकांमध्ये एकहाती सत्ता, इतर दोन ठिकाणी सत्तेकडे वाटचाल आणि मुंबईत शिवसेनेच्या बरोबरीने यश मिळवित भाजपाने जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला जबर धक्के बसले. एकाही महापालिकेत त्यांना बहुमत मिळाले नाही वा सत्तेच्या जवळदेखील जाता आलेले नाही. मुंबईत केवळ ३१ जागांवर समाधान मानावे लागल्यानंतर माजी खासदार संजय निरुपम यांनी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
ठाण्याचा गड राखत शिवसेनेने बहुमत मिळविले. तेथे राष्ट्रवादी दुसऱ्या तर भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहिली. नाशिक कोणाचे भाजपा, शिवसेना की मनसेचे याचे उत्तर भाजपाला बहुमत देत नाशिककरांनी दिले. निवडणुकीच्या काळात वादात अडकलेल्या भाजपावर नाशिककरांनी संपूर्ण विश्वास व्यक्त करीत सत्तेच्या चाव्या सोपविल्या. विदर्भातील अमरावती आणि अकोला महापालिकेत भाजपाने पहिल्यांदाच बहुमताने सत्ता संपादन केली आहे. सोलापूरमध्ये भाजपा बहुमताच्या नजीक आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या शहरात कमळ फुलले. तेथे शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. उल्हासनगरमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. साई आघाडी आणि अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे.
मनसेची दाणादाण
गेल्यावेळी नाशिकमध्ये सत्तेत असलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेला यावेळी केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. मुंबईत गेल्यावेळी २७ जागा जिंकलेल्या मनसेला सात जागांवर थांबावे लागले. पुण्यात गेल्यावेळी लक्षणीय यश मिळविलेल्या मनसेने दोनच जागा जिंकल्या.
नागपूर, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा जोरात
मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड असलेल्या नागपुरात भाजपा १४५ पैकी शंभरावर जागा जिंकत काँग्रेसला जोरदार तडाखा दिला. नेत्यांच्या आपसातील भांडणांमुळे त्रस्त असलेल्या काँग्रेसची नागपुरात दैना झाली.
पुण्यात गर्दी नसल्याने मुख्यमंत्र्यांची सभा रद्द करावी लागली म्हणून खिल्ली उडविली गेली त्याच पुण्याने बहुमताचे दान भाजपाच्या पदारात पहिल्यांदाच टाकले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेची चावी ही माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे होती पण तिथे भाजपाने राष्ट्रवादीला चारीमुंड्या चित करीत बहुमत मिळविले.
यांना धक्का
अजित पवार, राज ठाकरे
सुशीलकुमार शिंदे
यांचे यश
फडणवीस, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी