‘शिवसेना-भाजपावाले उद्या एकत्र येतील!’
By admin | Published: February 5, 2017 12:19 AM2017-02-05T00:19:19+5:302017-02-05T00:19:19+5:30
मागील सव्वादोन वर्षांपासून सेना-भाजपाचा वाटून खाण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. निवडणुकांच्या तोंडावर आज हे वेगळे झाल्याचे दाखवीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
उस्मानाबाद : मागील सव्वादोन वर्षांपासून सेना-भाजपाचा वाटून खाण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. निवडणुकांच्या तोंडावर आज हे वेगळे झाल्याचे दाखवीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मात्र, आज एकमेकांना शिव्या घालणारे हे दोन्ही पक्ष निवडणुकांनंतर सत्तेसाठी एकत्र येऊन जनतेला फसवतील. त्यामुळे हा डाव ओळखून महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी काँग्रेसलाच मतदान करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे शनिवारी काँग्रेसच्या राज्यातील प्रचाराचा शुभारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवराज पाटील चाकूरकर यांनीही आपल्या भाषणातून केंद्र व राज्य शासनाच्या कारभाराचा समाचार घेतला. मागील काही दिवसांपासून काँग्रेसने सत्तर वर्षांत काय केले, असा प्रश्न विचारला जातो. मात्र, काँग्रेसमुळेच देशातील लोकशाही टिकून आहे. आज शेजारी राष्ट्रात काय होतेय, हे एकदा पहा आणि त्यानंतर काँग्रेसला सत्तर वर्षांत काय केले, ते विचारा, असे ते म्हणाले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी गृहमंत्री असताना तिसरे सर्जिकल स्ट्राइक झाले होते. मात्र आम्ही त्याचा गवगवा केला नाही. मात्र या सरकारने त्याचा गैरवापर केला. (प्रतिनिधी)