स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीसाठी शिवसेना-भाजपा सकारात्मक
By admin | Published: October 27, 2016 05:08 PM2016-10-27T17:08:13+5:302016-10-27T18:24:49+5:30
काही महिन्यांवर आलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये युती होण्याची शक्यता आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - काही महिन्यांवर आलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये युती होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या गुरुवारी फोनवरून चर्चा झाली असून, त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती करण्याबाबत दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.
पक्षविस्तारासाठी भाजपाकडून स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी होत असलेली मोर्चेबांधणी, तसेच सरकारमध्ये सातत्याने मिळत असलेली दुय्यम वागणूक यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे शिवसेनेने निश्चित केले होते. मात्र तरीही दोन्ही पक्षांनी या निवडणुका एकत्र लढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.
तसेच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही गुरुवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर राऊत यांनी या चर्चेची माहिती शिवसेना पक्षप्रमुखांना दिली. दरम्यान, शिवसेना आणि भाजपाकडून स्थानिक पातळीवरील युतीबाबत संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच नाही पण शक्य असेल त्या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवण्याच्या शक्यतेला बळकटी मिळत आहे.