स्वबळाचा नारा देण्यास शिवसेना, भाजपा सिद्ध?

By admin | Published: October 8, 2016 02:45 AM2016-10-08T02:45:36+5:302016-10-08T02:45:36+5:30

स्वबळावर लढलो तरी आपल्यालाच राजकीय लाभ होणार असल्याचा दावा केला आहे, तर जागा वाढवण्याकरिता भाजपालाही स्वबळाचे वेध लागले आहेत.

Shiv Sena, BJP proves to be a voice vote? | स्वबळाचा नारा देण्यास शिवसेना, भाजपा सिद्ध?

स्वबळाचा नारा देण्यास शिवसेना, भाजपा सिद्ध?

Next


ठाणे : ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने युती करून अथवा स्वबळावर लढलो तरी आपल्यालाच राजकीय लाभ होणार असल्याचा दावा केला आहे, तर जागा वाढवण्याकरिता भाजपालाही स्वबळाचे वेध लागले आहेत. आरक्षणाने प्रस्थापितांच्या राजकीय भवितव्यावर साधा ओरखडाही उठला नसला तरी मजबूत प्रभागांत अनेक मातब्बर आमनेसामने येण्याची शक्यता असल्याने कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
प्रस्थापितांचे प्रभाग आरक्षणातून सुटले असले तरी नवख्यांना मात्र या सोडतीमुळे चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. शहराच्या जुन्या भागात, नौपाडा, कोपरी, वागळे पट्टा या भागांतील नगरसेवकांची संख्या कमी झाल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसणार आहे. विद्यमान नगरसेवकांखेरीज माजी नगरसेवक, पदाधिकारी हे उमेदवारीकडे डोळे लावून बसले होते. वॉर्डांची संख्या घटल्याने या इच्छुकांमधील स्पर्धा तीव्र होऊन बंडखोरी वाढण्याचीही शक्यता आहे.
खिडकाळी भागात राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक हिरा पाटील यांना फटका बसला आहे. दोन वॉर्ड महिलांकरिता व एक आरक्षित झाल्याने त्यांना संधी मिळणे कठीण आहे. माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांचा वॉर्ड फुटल्याने त्यांना इंदिसे कुटुंबीयांसमोर कडवी झुंज द्यावी लागणार असल्याचे चित्र आहे.
या दोघांखेरीज प्रस्थापितांपैकी महापौर संजय मोरे, विरोधी पक्षनेते संजय भोईर, देवराम भोईर, नजीब मुल्ला, अशोक वैती, नरेश म्हस्के, मनोज शिंदे, हरिश्चंद्र पाटील, सुधाकर चव्हाण, विलास सामंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे वॉर्ड आरक्षणात टिकून राहिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादीमधील आउटगोइंगचे प्रमाण वाढले असले तरी कळवा, मुंब्रा आणि राबोडीतील वॉर्ड वाढल्याने त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कळवा, मुंब्य्रातून ३६ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. तसेच त्यात आता राबोडीच्या चार नगरसेवकांचीदेखील राष्ट्रवादीत भर पडणार असल्याने कळवा, मुंब्य्रातील ३६ पैकी अधिकाधिक जागा निवडून आणून हा बालेकिल्ला आबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे शर्थीचे प्रयत्न राहणार आहेत.
प्रत्येक प्रभाग ४७ हजारांपासून ते ६१ हजार लोकसंख्येचा असेल. युती व आघाडी झाली, तर निवडणुकीत तिरंगी सामने पाहायला मिळतील. मात्र, दोन्हींची शक्यता धूसर असल्याने पंचरंगी किंवा सप्तरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. काही वॉर्डांत दोन किंवा त्यापेक्षा अधिक मातब्बर इच्छुक असल्याने तीव्र स्पर्धा होणार आहे. प्रभाग क्र. ९ हा अनुसूचित जातीसह ओबीसी महिला आणि खुल्या प्रवर्गातील एक महिला असा आरक्षित झाल्याने येथे उमेश पाटील की मनोज लासे, यांच्यातील एकालाच संधी मिळणार आहे. किंबहुना, यातील एकाला घरी बसावे लागणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे. दुसरीकडे कोपरीमध्येदेखील दोन नगरसेवक कमी झाल्याने त्याठिकाणी आयारामांची संख्या वाढल्यास शिवसेनेपुढे कोणाकोणाला तिकीट द्यायचे, असा पेच निर्माण झाला आहे. चार नगरसेवकांसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये घरच्या मंडळींबरोबर इतर पक्षांतून आलेल्यांचीदेखील भर पडल्याने कोणाला संधी द्यायची, असा पेच शिवसेनेपुढे आहे. प्रभाग क्र. १२ मध्येदेखील नारायण पवार आता काय भूमिका घेतात किंवा ते कोणत्या पक्षात जाणार, यावरच तेथील गणिते बिघडण्याची चिन्हे आहेत. येथील तिकीटवाटप ही शिवसेनेकरिता डोकेदुखी असणार आहे.
>प्रभाग क्र. १७ मध्ये शिवसेनेत उमेदवारीवरून वादंग होण्याची शक्यता आहे. येथे रामभाऊ तायडे यांना फटका बसण्याची चिन्हे असून ते खुल्या प्रवर्गातून लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच परिस्थिती १८ मध्येदेखील असणार आहे, तर प्रभाग क्र. १५ मध्ये बसपामधून भाजपामध्ये डेरेदाखल झालेले विलास कांबळे यांना उमेदवारी मिळवण्याकरिता भाजपाचेच राजकुमार यादव यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे.
>मनसेची घोषणाबाजी
आरक्षण सोडत सुरु होताच, मनसेने या सोडतीला आक्षेप घेतला. सोडत जाहीर होण्यापूर्वीच कुठला वॉर्ड कुठल्या जाती-जमातीकरिता आरक्षित होणार त्याचा पेपर कसा फुटला, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी गडकरी रंगायतनमध्ये गोंधळ घातला. ‘पालिका प्रशासन हाय हाय’ अशा घोषणा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या आणि आरक्षण सोडत रद्द करावी, अशी मागणी लावून धरली. परंतु या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असल्याने पोलिसांनी तत्काळ या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
सोडत रद्द करण्याची भाजपाची मागणी
आरक्षणाचा तपशील सोडतीपूर्वीच जाहीर झाल्याने शुक्रवारी शहर भाजपाने आयुक्त संजीव जयस्वाल यांना सोडत रद्द करावी, अशी मागणी केली. ज्या अधिकाऱ्याने आरक्षणाचा तपशील फोडला त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी, असेही म्हटले. परंतु आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शहराध्यक्ष संदीप लेले यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
>अनुसूचित जातीमधील महिलांसाठीचे प्रभाग
क्र. ३ अ, ६ अ, १५ अ, १६ अ, २४ अ,
अनुसूचित जमाती महिलांसाठीचे प्रभाग
प्रभाग क्र. १ अ, २ अ आरक्षित करण्यात आले आहेत.
नागरीकांच्या मागास प्रवर्गातून (ओबीसी) महिलांसाठी आरक्षित झालेले वॉर्ड -
प्रभाग क्र. १ ब, २ ब, ५ ब, ७ ब, ९ ब, ११ अ, १६ ब, १७ अ, १९ अ, २१ ब, २२ ब, २४ ब, २५ ब, २६ ब, २८ ब, ३० अ, ३१ अ, ३२ अ
खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झालेले वॉर्ड
प्रभाग क्र. ३ क, ४ ब आणि क, ५ क, ६ क, ७ क, ८ ब आणि क, ९ क, १० ब आणि क, ११ ब, १२ ब आणि क, १३ ब आणि क, १४ ब आणि क, १५ क, १७ ब, १८ ब आणि क, १९ ब, २० ब आणि क, २१ क, २२ क, २३ ब आणि क, २५ क, २६ ब, २७ ब आणि क, २८ क, २९ ब आणि क, ३० ब, ३१ ब, ३२ ब, ३३ ब
>कांटे की टक्कर
प्रभाग क्र. २१ मध्ये शिवसेनेत अनेक इच्छुक असून हा प्रभाग ओबीसी पुरुष, ओबीसी महिला आणि महिला असा आरक्षित झाल्याने खुल्या गटातील पुरुष नगरसेवकांना येथे जबरदस्त फटका बसणार आहे.
सध्या येथे शिवसेनेचे हिराकांत फर्डे, विलास सामंत, सुजाता पाटील अशी नगरसेवकांची फळी आहे. तर, भाजपामधून संजय वाघुले, सुहासिनी लोखंडे अशी फळी असल्याने या प्रभागात कांटे की टक्कर पाहावयास मिळणार आहे.
प्रभाग क्र. २२ मध्येदेखील शिवसेनेत अशीच काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे जुन्या ठाण्यासह वागळे पट्ट्यात शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी होणार असल्याने कोणाच्या पारड्यात उमेदवारी पडणार, नेते कोणाकडे आपले वजन टाकणार आणि कोणाचा पत्ता साफ होणार, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Web Title: Shiv Sena, BJP proves to be a voice vote?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.