शिवसेना-भाजपात राडा

By admin | Published: July 6, 2017 05:28 AM2017-07-06T05:28:51+5:302017-07-06T05:28:51+5:30

जकातीच्या मोबदल्यात राज्य सरकारने मुंबई महापालिकेला ६४७ कोटी ३४ लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला खरा; परंतु या धनादेश

Shiv Sena-BJP Rada | शिवसेना-भाजपात राडा

शिवसेना-भाजपात राडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जकातीच्या मोबदल्यात राज्य सरकारने मुंबई महापालिकेला ६४७ कोटी ३४ लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला खरा; परंतु या धनादेश वाटपाच्या कार्यक्रमात भाजपाच्या नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्याने महापालिकेत चांगलाच राडा झाला. त्यातूनच शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपा नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना धक्काबुक्की, मारहाण केल्याने सभागृहाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी हा राडा रोखण्याऐवजी मौन बाळगल्याने नगरसेवकांना पायबंद उरला नव्हता.
महापालिकेचा आर्थिक कणा असलेला जकात कर १ जुलैपासून बंद होऊन वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून महापालिकेला साडेपाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत. या भरपाईचा ६४७ कोटींचा पहिला धनादेश राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सुपुर्द केला. धनादेश देण्याच्या या कार्यक्रमाला पालिका सभागृहात सोहळ्याचे स्वरूप देण्यात आले. यासाठी सभागृह आणि महापौरांचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले होते. उद्धव ठाकरे आणि मुनगंटीवार यांचे पालिका सभागृहात आगमन होताच भाजपाच्या नगरसेवकांनी ‘मोदी-मोदी’ घोषणाबाजी सुरू केली.
तर त्यांना प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी ‘चोर है-चोर है’ घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. ही घोषणाबाजी हाणामारीवर उतरण्याची शक्यता दिसू लागल्याने अखेर महापौर

विश्वनाथ महाडेश्वर यांनी हस्तक्षेप करत नगरसेवकांना शांत केले. मात्र उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना सभागृहाबाहेर जाणाऱ्या भाजप नगरसेवकाला चोप देऊन शिवसेनेच्या नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.
घोषणायुद्धात नेते मौन
या कार्यक्रमाला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विद्या ठाकूर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, भाजपचे खासदार, आमदार उपस्थित होते. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री रवींद्र वायकर, सुभाष देसाई, दिवाकर रावते, खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. या नेत्यांसमोरच नगरसेवकांचे घोषणायुद्ध रंगले. मात्र आपापल्या पक्षाच्या नगरसेवकांना शांत करण्याची तसदी या नेत्यांनी घेतली नाही. यावरूनच या वादावादीला त्यांचे मूक समर्थन असल्याचे दिसून आले.

सत्ताबाह्य केंद्राला राजमान्यता!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे साधे नगरसेवकही नसताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या हाती नुकसान भरपाईचा धनादेश सुपूर्द करणे हे तर सत्ताबाह्य हस्तक्षेपाला राजमान्यता देण्यासारखे आहे, अशी टीका काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली. वित्तमंत्र्यांनी महापौर अथवा आयुक्तांच्या हाती धनादेश सुपूर्द करायला हवा होता, असा सूर महापालिका वर्तुळात उमटला.

भाजपा नगरसेवक नार्वेकर यांना मारहाण
उद्धव ठाकरे यांचे भाषण सुुुुरू असताना भाजपाचे काही नगरसेवक सभागृहाबाहेर  पडू लागले. आपल्या नेत्याचे भाषण सुरू असताना भाजपा नगरसेवकांनी सभागृहातून निघून जाणे शिवसेनेच्या नगरसेवकांना रुचले नाही. त्यामुळे संतप्त शिवसेना नगरसेवकांनी भाजपाचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.
नार्वेकर हे यापूर्वी शिवसेनेच्या समर्थनावर निवडून येत होते. २०१२  ते २०१७ या काळात त्यांनी विधि समिती अध्यक्षपदही भूषवले. मात्र २०१७च्या निवडणुकीत ते भाजपाच्या तिकिटावर नगरसेवकपदावर निवडून आले. याचाच राग शिवसैनिकांच्या मनात असल्याचे सांगण्यात येते.


मारहाण नव्हे, धक्काबुक्की
भाजपाचे नगरसेवक नार्वेकर यांना पालिका सभागृहात येण्यापूर्वीच महापालिकेच्या गेट क्रमांक ३वर धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर त्यांना शिवसैनिकांनी मारहाणही केली. परंतु आपल्याला धक्काबुक्कीच झाली आहे. पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय पक्ष घेईल, असे मत नार्वेकर यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी मात्र नार्वेकरांना मारहाण केल्याचे जाहीरपणे कबूल केले.


तर दर मिनिटाला सरकारला पाठिंबा - ठाकरे
जीएसटीमुळे कर पद्धतीमध्ये सुधारणा होत असली तरी ठरावीक कालावधीनंतर सरकारने त्याचा आढावा घ्यावा. जीएसटीमुळे नवीन पर्वाला सुरुवात झाल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करतानाच शिवसेनेला दिलेला शब्द सरकारने पाळला असला, तरी शिवसेनेच्या प्रत्येक सूचनाही मान्य केल्या तर दर मिनिटाला सरकारला पाठिंबा देऊ, असा चिमटाही काढला. तुम्ही चेक देताय आणि आम्ही घेतोय असे नाही, तर हा जनतेचा पैसा आहे यावर कोणी डल्ला मारू नये, म्हणून हा घेण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी सुनावले.

सरकारने शब्द पाळला -मुनगंटीवार
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात भाजपा सरकारला याचे श्रेय देण्याचा प्रयत्न केला. ‘गुड व सिम्पल टॅक्स’ पद्धत लागू झाली आहे. देशात नवीन आर्थिक पर्वाला सुरुवात झाली आहे. सरकारने आर्थिक भरपाईबाबत दिलेला शब्द आज पाळला, असे स्पष्ट करताना उद्धव ठाकरे यांनी जीएसटीला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. भविष्यात जीएसटीतून राज्य सरकारला आर्थिक लाभ मिळाल्यास महापालिकेला आणखी आर्थिक मदत देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Shiv Sena-BJP Rada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.