साहित्याच्या व्यासपीठावर शिवसेना-भाजपात राडा
By Admin | Published: February 6, 2017 03:23 AM2017-02-06T03:23:45+5:302017-02-06T03:23:45+5:30
शिवसेना-भाजपा या राज्यातील सत्ताधारी पक्षांची युती तुटल्यानंतर, सध्या निवडणुकीच्या आखाड्यात या दोन पक्षांमध्ये सुरू असलेला संघर्ष रविवारी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरही पाहायला मिळाला.
पु. भा. भावे साहित्यनगर (डोंबिवली) : शिवसेना-भाजपा या राज्यातील सत्ताधारी पक्षांची युती तुटल्यानंतर, सध्या निवडणुकीच्या आखाड्यात या दोन पक्षांमध्ये सुरू असलेला संघर्ष रविवारी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरही पाहायला मिळाला.
२७ गावांकरिता स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याबाबतचा ठराव मांडण्यावरून या संमेलनाचे सूप चांगलेच ‘वाजले’!
संमेलनाच्या समारोप सत्रात मांडलेल्या ३० ठरावातील २३ क्रमांकाचा ठराव हा २७ गावांकरिता स्वतंत्र नगरपालिका उभारण्याबाबत होता. संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी हा ठराव मांडण्याकरिता पुढाकार घेतला होता. त्याला कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आक्षेप घेतला. ही २७ गावे भाजपाने सत्तेवर येताच महापालिकेत समाविष्ट केली. त्यानंतर, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ती वगळण्याचा अध्यादेश काढला. मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. शिवसेनेचे ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यास समर्थन होते, तर भाजपाच्या स्थानिक नेत्यांसह या गावातील नागरिकांच्या संघर्ष समितीचा विरोध होता. संमेलनाचे स्वागताध्यक्ष वझे हे त्या संघर्ष समितीचे उपाध्यक्ष आहेत.
ठराव मांडला जाताच महापौर देवळेकर उभे राहिले व त्यांनी आपला या ठरावाला विरोध असून हा ठराव मांडायचाच असेल; तर ग्रामीण भागातील भोपर, भाल येथील मोठ्या जमिनीवरील डम्पिंग ग्राऊंडचे आरक्षण रद्द करावे, लोढा बिल्डरला ग्रोथ सेंटरकरिता एमएमआरडीएने देऊ केलेली जमीन काढून घ्यावी व प्रकल्प रद्द करावा, हे ठराव मांडण्यास अनुमती मागितली. राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी महापौरांच्या भूमिकेला विरोध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेला अनुसरून हा ठराव झाला असल्याचे ते म्हणाले. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांत संंमेलनातील ठरावावर अशी प्रतिक्रिया देण्याकरिता कुणीही उभे राहिले नसल्याने मी महापौरांच्या भूमिकेचे स्वागत करतो. संमेलनात मांडलेला ठराव महापौरांच्या भूमिकेसह सरकारकडे धाडला जाईल, असे जोशी यांनी जाहीर केले. त्यानंतर देवळेकर यांनी तीन ठराव मांडले व डम्पिंग ग्राऊडकरिता जमीन आरक्षित करण्यास तसेच ग्रोथ सेंटरच्या उभारणीस विरोध केला. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी मागणी करणारा ठरावही त्यांनी केला. लागलीच राज्यमंत्री चव्हाण उभे राहिले व ते म्हणाले, की महापौरांना कमी माहिती असल्याने त्यांनी हा ठराव केला आहे. या ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून कल्याण-डोेंबिवलीतील ५० हजार युवकांना रोजगार मिळणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी या सेंटरला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते मनसेचे प्रकाश भोईर यांनी ग्रोथ सेंटरकरिता ग्रामस्थांच्या जमिनी घेण्यात येत असल्याने त्यांना या प्रकल्पात भागीदारी देण्याची मागणी केली.
शिवसेना-भाजपाच्या स्थानिक नेत्यांची ही शाब्दिक लढाई व्यासपीठावरुन पाहणारे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे म्हणाले की, पुढच्या वर्षी राजकारण्यांचे संमेलन येथेच घेऊ व त्याचे स्वागताध्यक्ष देवळेकर यांना करु आणि आमचे रवींद्र चव्हाण यांना उपाध्यक्ष करु. संमेलनाचे हे व्यासपीठ मनोमिलनाचे व्यासपीठ असल्याचे श्रीपाद जोशी यांनी म्हटले असल्याने युतीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी पुढच्यावेळी याच व्यासपीठावर करु, अशी टिप्पणीही तावडे यांनी केली.
मराठी साहित्याचा विदेशी भाषांत अनुवाद करणार- तावडे
मराठी भाषेतील साहित्याचा देशी व मुख्यत्वे विदेशी भाषेत भाषांतर करण्याचा प्रकल्प सरकार तातडीने सुरु करील, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी दिली. मार्च महिन्यातील विधिमंडळ अधिवेशन संपल्यावर संमेलनात केलेल्या ठरावांच्या अंमलबजावणीकरिता संमेलनाध्यक्ष व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मराठी भाषा दिनानिमित्त येत्या २७ फेब्रुवारीस सर्व मराठी बांधवांनी विकिपीडियावर एकेक पान लिहावे, असे आवाहन त्यांनी केले.
सत्य नाही, सूत्रेच स्वीकारतो !
पूर्वाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सूत्रे सोपवताना ‘सूत्रे नाही, सत्य
सोपवत आहे’ असे सांगितले होते. याक डे मी अंतर्मुख होऊन विचार
करतो आहे. हे सत्य पचवण्याची क्षमता आपल्या व्यक्तिमत्त्वात आहे की नाही, यावर विचार करतो आहे. सत्यासाठी येशू ख्रिस्ताला सुळावर चढावे लागले. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींनाही यातना सहन कराव्या लागल्या. त्यामुळे मी सत्याकडे अंतर्मुख होऊन पाहत आहे. सत्य नाही, सूत्रेच स्वीकारतो आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे
यांनी साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी केले. -वृत्त/४
उद्धव ठाकरे अनुुपस्थित : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समारोपाला हजर राहण्याचे टाळले. महापालिका निवडणूक प्रचाराकरिता ठाण्याच्या वेशीवरील मुलुंडला आलेले ठाकरे डोंबिवलीकडे फिरकले नाहीत. ठाकरे हजर असते, तर कदाचित तावडे-ठाकरे यांनाही २७ गावांच्या जुगलबंदीत उतरावे लागले असते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे हेही संमेलनाकडे फिरकले नाहीत.
भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचा पुण्यातील पुतळा फोडण्याच्या घटनेचा तीव्र निषेध करणारा आणि अशा वारंवार घडणाऱ्या कृत्यांना आळा घालण्यात सरकारला येत असलेल्या अपयशाबद्दल खेद प्रकट करणारा, तसेच हे कृत्य करणाऱ्या प्रवृत्तींचा कडक बंदोबस्त करण्याची मागणी करणारा ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. या ठरावात या कृत्याची जबाबदारी घेणाऱ्या कुठल्याही संघटनेचा अथवा व्यक्तीचा ठोस उल्लेख केलेला नाही.