"शिवसेना-भाजपा नैसर्गिक युती व्हावी, उद्धव ठाकरेंनी सकारात्मक भूमिका घ्यावी’’, सेनेच्या अजून एका खासदाराचं स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 12:32 PM2022-07-12T12:32:05+5:302022-07-12T12:32:37+5:30
Hemant Godse, Shiv Sena: शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील नैसर्गिक युती व्हावी, तसेच त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असं मत मांडलं आहे.
मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेला धक्का दिल्यानंतर शिवसेनेचे अनेक खासदारही बंडाचा झेंडा हाती घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, शिवसेनेचे लोकसभेतील अनेक खासदार भाजपाशी जुळवून घेण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील नैसर्गिक युती व्हावी, तसेच त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असं मत मांडलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना हेमंत गोडसे यांनी सांगितले की, आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती होतेय, त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा, असं मत बऱ्याचशा खासदारांनी व्यक्त केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
गोडसे पुढे म्हणाले की, खरंतर मी नाशिकचा खासदार म्हणून ८ वर्षे काम करत आहे. कुठलंही काम करायचं ठरलं तर राज्य आणि केंद्र हे संयुक्तपणे करत असतं. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युती नैसर्गिक युती आहे. नाशिक लोकसभेचा विचार केला या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी नाशिक शहरातील तीन आमदार हे भाजपाचे आहे. तर ग्रामीण भागातील तीन आमदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. ते शिवसेनेविरोधात लढून निवडून आलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कायम ठेवली तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते अडचणीचं ठरेल. शिवसेनेचा उमेदवार काय करेल, हा प्रश्न उपस्थित होईल, अशी भीती गोडसे यांनी व्यक्त केली.
भाजपासोबतचा २५ वर्षांचा युतीचा अनुभव आणि महाविकास आघाडीतील अडीच वर्षांचा आघाडीचा अनुभव पाहता आपण युतीकडे जावं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन संवाद साधून मार्ग निघतो का हे पाहावं, असे मत अनेक खासदारांनी मांडली, असे हेमंत गोडसे यांनी सांगितले. तसेच भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युती झाल्यास अनेक विकास कामं मार्गी लागतील, असं मतही हेमंत गोडसे यांनी मांडलं. युतीबाबत आम्ही आमचं मत पक्षप्रमुखांसोबत मांडलं आहे. आता ते त्यावर सकारात्मक भूमिका घेतील, अशी अपेक्षा हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदारांच्या झालेल्या बैठकीमध्ये काहीही करा पण भाजपसोबत चला. आपण भाजपसोबत गेलो नाही तर त्याचा मोठा फटका आम्हा सगळ्यांनाच बसेल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही भाजप हाच आपला नैसर्गिक मित्र असून काँग्रेस, राष्ट्रवादी आपल्याला कधीही साथ देणार नाहीत, असे समर्थन बहुतेक खासदारांनी केले.असा आग्रह शिवसेनेच्या बहुतेक खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना सन्मानाने परत घ्या, यावरही खासदारांनी जोर लावला, अशी माहिती समोर येत आहे.
या बैठकीला प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, विनायक राऊत, सदाशिव लोखंडे, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, हेमंत गोडसे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, राजन विचारे हे खासदार उपस्थित होते.