शिवसेना-भाजप सोबत असल्याने सुजयला अडचण नाही; विखे पाटलांची पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 08:23 PM2019-04-01T20:23:55+5:302019-04-01T20:25:44+5:30
राधाकृष्ण विखे : माझे मार्गदर्शन त्याला असतेच
अहमदनगर : सुजय स्वत:चा निर्णय घेण्यास सक्षम आहे. त्यानुसार त्याने निर्णय घेतला. तो चुकीचा निर्णय घेईल, असे वाटत नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आज सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत केले. शिवसेना-भाजपचे सर्व कार्यकर्ते सोबत असल्याने सुजय याला काही अडसर आहे असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.
सुजय यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे व त्यांच्या आई शालिनी विखे या उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित नव्हत्या. राधाकृष्ण व शालिनी विखे हे कॉंग्रेसमध्येच असल्याने ते सुजय यांच्या प्रचारात जाहीरपणे सहभागी नाहीत. मात्र, त्यांनी ठिकठिकाणी सुजय यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
नगर शहरात आज पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, सुजय याने आजवर आत्मविश्वासाने राजकारण केले. माझे त्याला सतत मार्गदर्शन मिळत गेले. तो कुठलाही चुकीचा निर्णय घेईल असे वाटत नाही. सुजय यांचा भाजपातील प्रवास कसा राहील? याकडे लक्ष वेधले असता विखे म्हणाले, सेना-भाजपचे नेते त्याच्या सोबत असल्याने त्याला काहीही अडचण येणार नाही.