शिवसेना हाच भाजपाचा नैसर्गिक साथीदार - अरूण जेटली
By admin | Published: October 22, 2014 05:40 PM2014-10-22T17:40:10+5:302014-10-22T17:40:10+5:30
शिवसेना हा भाजपाचा नैसर्गिक साथीदार असल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये अनौपकारीक चर्चा सुरू असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगतले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - शिवसेना हा भाजपाचा नैसर्गिक साथीदार असल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये अनौपकारीक चर्चा सुरू असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगतले. भाजपाला बहुमत मिळालेले नसल्यामुळे कुणाचा पाठिंबा न घेता अल्पमतातले सरकार स्थापन करण्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचेही जेटली यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. राष्ट्रवादीने स्वत:हून भाजपाला पाठिंबा दिल्याचे जेटली म्हणाले, आणि असा पाठिंबा कुणी दिला तर आम्ही त्यांना लाथाडू शकत नाही असे सूचक विधानही त्यांनी केले.
मात्र, शिवसेना हाच भाजपाचा नैसर्गिक साथीदार असून येत्या काही दिवसांमध्ये सकारात्मक चर्चा घडेल आणि युती होऊन सरकार स्थापन होईल अशी आशा जेटली यांनी व्यक्त केली. काळ्या पैशाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना दोन देशांमधल्या करारांचा भंग न करता, यासंदर्भातल्या दोषींची नावे कोर्टासमोर पर्यायाने देशासमोर ठेवण्यात येतील असेही जेटली यांनी सांगितले. काँग्रेसशी संबंधित मंत्र्याचे नाव काळा पैसा दडवलेल्यांच्या यादीत असल्याच्या संदर्भात जेटली यांनी स्पष्टपणे तसा आरोप केला नाही, परंतु तशी शक्यता असल्याचे सूचक विधान केले.
जर कुणीही व्यक्ती वा राजकारणी या संदर्भात दोषी आढळला तर त्याचे नाव जाहीर करण्यात येईल अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. तसेच हरयाणामधल्या डीएलएफ व रॉबर्ट वद्रा यांच्यात झालेल्या व्यवहारांमध्ये सकृतदर्शनी पाणी मुरत असल्याचे दिसत असल्याचे जेटली म्हणाले. नवीन सरकार स्थापन झाल्यावर या संदर्भात योग्य ती कारवाई करेल असेही जेटली म्हणाले.