जागावाटप ठरले, पण मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना - भाजपाचे मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 09:14 PM2019-02-18T21:14:47+5:302019-02-18T21:15:08+5:30
नाही नाही म्हणता म्हणता शिवसेना आणि भाजपाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली आहे.
मुंबई - नाही नाही म्हणता म्हणता शिवसेना आणि भाजपाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. मात्र शिवसेना आग्रही असलेल्या मुख्यमंत्रिपदाबाबत दोन्ही पक्षांनी या संयुक्त पत्रकार परिषदेत मौन बाळगले.
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आमचाच अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांनी अनेकदा केली होती. मात्र आज शिवसेना-भाजपामधील जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा केली त्यावेळी मुख्यमंत्रिपदाबाबत दोन्ही पक्षांकडून काही महत्त्वपूर्ण घोषा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र मुख्यमंत्रिपदाच उल्लेखही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी या संयुक्त पत्रकार परिषदेत केला नाही. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि भाजपामध्ये पडद्याआड नेमक्या काय वाटाघाटी झाल्या याबाबतचा संभ्रम वाढला आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीची औपचारिक घोषणा आज झाली. युतीच्या घोषणेबरोबरच दोन्ही पक्षांमधील जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणाही झाली आहे. या फॉर्म्युल्यानुसार लोकसभा निवडणुकीत भाजपा 25 तर शिवसेना 23 जागांवर लढणार आहे. तर विधानसभेमंध्ये जागावाटपाचा 50-50 चा फॉर्म्युला दोन्ही पक्षांनी मान्य केला असून, मित्रपक्षांना ठरावीक जागा देऊन उर्वरित जागांचे दोन्ही पक्षांमध्ये निम्म्या निम्म्याने वाटप होणार आहे.