सीमाप्रश्नी शिवसेना रस्त्यावर; कोल्हापूर, सांगलीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 05:45 AM2019-12-30T05:45:12+5:302019-12-30T06:32:45+5:30
मध्यवर्ती बसस्थानक परिसर चौक (सीबीएस) ते दाभोळकर कॉर्नरपर्यंत जोरदार घोषणा देत संतप्त शिवसैनिकांनी निषेध फेरी काढली.
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील, कर्नाटकचे माजी शिक्षणमंत्री बसवराज होरट्टी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यात संताप व्यक्त होत आहे. शिवसैनिकांनी रविवारी कोल्हापुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि भीमाशंकर पाटील यांच्या पुतळ्यांचे दहन केले. त्यामुळे कर्नाटकला जाणारी एस.टी. बससेवादेखील ठप्प होती.
मध्यवर्ती बसस्थानक परिसर चौक (सीबीएस) ते दाभोळकर कॉर्नरपर्यंत जोरदार घोषणा देत संतप्त शिवसैनिकांनी निषेध फेरी काढली.
कोल्हापुरातील अप्सरा चित्रपटगृहात येथे सुरू असलेल्या ‘अवणे श्रीमनारायण’ हा कन्नड चित्रपट युवासैनिकांनी दुपारी बंद पाडला. कोल्हापुरातून कर्नाटकडे जाणारी एस.टी. बसची सर्व वाहतूक प्रशासनाने शनिवारी रात्री बंद केली. रविवारी दिवसभर ही वाहतूक बंद होती.
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्येही कर्नाटक वेदिका-शिवसेना आमने-सामने आले. शिवसेनेने काढलेल्या तिरडी मोर्चा ठिकाणी कर्नाटक रक्षक वेदिका संघटनेचे कार्यकर्तेही दाखल झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही बाजूकडून मोठी घोषणाबाजी करण्यात आली. कऱ्हाडमध्ये दत्त चौकात शिवसैनिकांनी निदर्शने केली.
सीमाभागातील मराठी बांधवांना त्रास झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही. महाराष्ट्रामध्ये कर्नाटकातील बांधव सुरक्षित आहेत. त्याचा बोध कर्नाटक सरकारने घ्यावा. वादग्रस्त विधान करणाऱ्या भीमाशंकर पाटील याला कर्नाटक सरकारने अटक करावी.
- धैर्यशील माने, शिवसेना खासदार