Shiv Sena Bow And Arrow : 'शिवसेना' अन् 'धनुष्यबाणा'ची लढाई जिंकल्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 07:25 PM2023-02-17T19:25:45+5:302023-02-17T19:26:35+5:30
मुख्यमंत्री एकनाख शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया देत हा लोकशाहीचा आणि भारतीय घटनेचा विजय असल्याचं म्हटलं.
“सर्वप्रथम मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो. हा लोकशाहीचा आणि घटनेचा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. सर्वांना मी शुभेच्छा देतो. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं आणि आज सत्याचा विजय झाला आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “जो संघर्ष केला त्याचा आज विजय झाला आहे. हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. त्यांचे विचार, त्यांची भूमिका घेऊन सरकार स्थापन केलं. अखेर आज सत्याचा विजय झाला आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
The Election Commission of India today ordered that the party name “Shiv Sena” and the party symbol “Bow and Arrow” will be retained by the Eknath Shinde faction. pic.twitter.com/cyzIZCm8sh
— ANI (@ANI) February 17, 2023
निवडणूक आयोगाकडून निकाल
ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पहिल्यापासून धनुष्यबाण चिन्हासाठी मागणी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगात युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे.
सुनावणी दरम्यान, दोन्ही गटाकडून कागदपत्र सादर करण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा निकाल राखून ठेवला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज हा निकाल दिला आहे. काही महिन्यातच मुंबई महापालिकेसाठी निवडणूक जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवरच आज आयोगाने चिन्हावर निर्णय दिला आहे.