मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार!
By admin | Published: June 8, 2017 06:24 AM2017-06-08T06:24:56+5:302017-06-08T06:24:56+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना चर्चेला बोलावता आणि आम्हाला सांगतही नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्जमाफीचा निर्णय जाहीर करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना चर्चेला बोलावता आणि आम्हाला सांगतही नाहीत, असा त्रागा करत शिवसेना मंत्र्यांनी बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर भाजपा आमदारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शिवसेनेला बाहेरचा मार्ग दाखवा, गरज पडली तर मध्यावधी निवडणुका घ्या, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणणे सुरू केले आहे.
सत्तेची फळे चाखताना ‘हम साथ साथ है’ असे म्हणायचे आणि बाहेर पडले की ‘हम आपके है कौन?’ म्हणत आमच्याकडेच बोट दाखवायचे, हे वागणे शेतकऱ्यांना चांगलेच कळते, अशा शब्दांत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी शिवसेनेचे मंत्री आले, पण त्यांचा सगळा रोख कर्जमाफीची मागणी आम्हीही केली असताना, घोषणा करताना आम्हाला का बोलावले नाही? यावरच होता. तुम्ही आणि आम्ही दोघेही एकच मागणी करत होतो, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. पण ती कोणत्या शेतकऱ्यांना कशी द्यायची याची चर्चा आपण सगळे मिळून करू, असे मुनगंटीवार बैठकीत म्हणाले. बहिष्कार टाकून चर्चा कशी होऊ शकते? तुम्हाला काय हवे आहे ते बसून चर्चा करू, त्यानुसार नियोजन करू, असेही ते म्हणाले. पण एकच एक मुद्दा सेनेचे मंत्री मांडत राहिले.
श्रेय घेण्यासाठी काय अडून बसता. अशा कोणत्याही श्रेयाची ‘एक्सपायरी डेट’ एक वर्षापेक्षा अधिक राहात नाही. उरलेली अडीच वर्षे हे सरकार चालणार आहे, असे खडे बोल भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने बैठकीत ऐकवले. त्यानंतर आम्हाला आता बैठकीत बसायचे नाही, असे सांगून शिवसेनेचे मंत्री बाहेर पडले.
लोकमतशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, जीएसटीच्या वेळीही आपण स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो, आता सेनेच्या मनात काय चालू आहे हे समजण्याएवढे आम्ही मनकवडे नक्कीच नाही, असा चिमटाही मुनगंटीवार यांनी काढला.
या सगळ्यावर शिवसेनेचा एकही मंत्री बोलायला तयार नाही. उद्धव ठाकरे सुटीसाठी युरोपात गेले आहेत. १२ तारखेला ते परत आल्यानंतर चर्चा करून आम्ही बोलू, असे काहींनी खासगीत सांगितले. त्यानंतरच शेतकरी संपाबद्दल शिवसेनेची भूमिका स्पष्ट होणार असली तरीही, खा. संजय राऊत यांनी बुधवारीच पडद्यआड बऱ्याच हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.
>बसून चर्चा करणे अपेक्षित
जी मागणी शिवसेना करत होती, त्याच कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली असताना बहिष्कार टाकण्याचे कारणच काय? उलट त्यांनी बसून चर्चा करणे अपेक्षित होते, मात्र काही महत्त्वाचे विषय नाहीत, म्हणून आम्ही बैठकीत बसणार नाही, असे मुख्यमंत्र्यांना सांगून सेनेचे मंत्री बैठकीतून गेले. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी द्यायची याची चर्चा करण्यापेक्षाही त्यांना कदाचित आणखी महत्वाची कामे असतील, असेही मुनगंटीवार म्हणाले.