शिवसेना वर्धापन दिनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार?; नाराजांची होणार महामंडळावर बोळवण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 12:55 PM2023-06-06T12:55:00+5:302023-06-06T12:56:03+5:30
अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतली.
मुंबई –राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलीय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील सरकारवरील धोका टळला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार करावा अशी मागणी इच्छुकांनी लावून धरली आहे. त्यात शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी म्हणजे १९ जून पूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याबाबतच्या भेटीगाठीच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.
अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतली. त्या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यात छोटेखानी विस्तार लवकरच उरकला जाईल. काही इच्छुकांना महामंडळ देऊन त्यांची बोळवण करण्यात येईल. तर उर्वरित १३ मंत्रिपदाचे वाटप हे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केले जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाल्याचा दावा एबीपीने वृत्तात केला आहे.
मंत्रिमंडळाच्या छोटेखानी विस्तारात १० मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. त्यात भाजपाचे ६ तर शिवसेनेचे ४ मंत्री बनवले जातील. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काहीजण नाराज होण्याची शक्यता लक्षात घेता महामंडळाचे वाटप करून त्यावर अनेकांची बोळवण करण्यात येऊ शकते. कुठल्या महामंडळावर कुणाची वर्णी लावावी यासाठी यादी बनवली जात आहे. त्यात भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.