शिवसेनेचा उमेदवार रिंगणात
By Admin | Published: March 4, 2017 03:06 AM2017-03-04T03:06:01+5:302017-03-04T03:06:01+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आपला उमेदवार उतरवणार आहे
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आपला उमेदवार उतरवणार आहे. त्यामुळे ही निवडणूक शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते तेवढी सोपी नसल्याचे संकेत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांनी दिले. अलिबाग येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तिसऱ्या क्र मांकावर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदावर दावा करणार असेल तर शिवसेनेकडे अवघे चार सदस्य कमी आहेत. शेकापने राष्ट्रवादीसमोर नांगी टाकल्यामुळे त्यांच्यातच गट-तट पडले आहेत. त्यामुळे शिवसेना २१ मार्चला चमत्कार करील असा दावाही त्यांनी केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत २३ जागा घेऊन शेकाप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या १२ जागा मिळाल्या आहेत, तसेच काँग्रेस आणि भाजपा यांना प्रत्येकी तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. मतदारांनी नाकारलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होऊच कसा शकतो? शेकाप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची ही गॅटमॅट शेकापच्या नवीन सदस्यांना पचणारी नाही. त्यामुळे या पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे दळवी यांनी सांगितले. शेकापच्या याच नाराजीचा फायदा शिवसेना उचलणार असल्याचेही स्पष्ट केले.
शिवसेनेचे १८ सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय आणखी ६ सदस्य सेनेच्या संपर्कात आहेत असा दावा करतानाच दळवी यांनी, २१ तारखेपर्यंत आपण बहुुमताचा आकडा गाठू असा विश्वास व्यक्त केला. यासंदर्भात शुक्र वारी पाली येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापण्याबाबत सर्व शक्यतांवर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल त्याबाबत सांगितले नाही. मात्र दळवी यांनी शिवसेना अध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर के ले.(प्रतिनिधी)
>दळवी यांनी शिवसेना अध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्यामुळे शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सतर्क झाली आहे. निवडून आलेले सदस्य दळवींच्या गळाला लागू नये, यासाठी त्यांच्याकडून दक्षता घेतली जात असल्याचे बोलले जाते.