Maharashtra Politics: “शहाजीबापू, पुन्हा मातोश्रीवर चला, उद्धव ठाकरेंना सांगून चांगली खुर्ची देतो”; खैरेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 07:24 PM2022-09-13T19:24:25+5:302022-09-13T19:26:34+5:30
एकनाथ शिंदेंपेक्षा आदित्य ठाकरेंच्या सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडेच पैठण दौऱ्यावर होते. पैठण येथील एका सभेला एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदार आणि भाजप नेतेही उपस्थित होते. या सभेत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीकडून केल्या जात असलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. यावेळी शहाजीबापू पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी शिवसेना आणि मविआवर सडकून टीकाही केली. यानंतर आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर पलटवार करताना, शहाजीबापू पाटील यांना मातोश्रीवर परतण्याचे आवाहन केले आहे.
पैठण येथे झालेल्या सभेला पैठण मतदारसंघातील २५ टक्के लोकंही नव्हते. ७५ टक्के लोकं बाहेरून आणलेले होते. याबाबतच पुरावेही देऊ शकतो. शिवसेना प्रमुखांचाच विचार पुढे घेऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जात आहेत. शिंदे यांच्या सभेपेक्षा तर आदित्य ठाकरेंच्या सभेला आणि दौऱ्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला. तसेच सभेला उत्तर म्हणून पुन्हा सभा न घेता आता गावागावात जाऊन प्रचार, प्रसार आणि जनजागृती करणार असल्याचा प्लान खैरे यांनी सांगितला.
मी ओरिजिनल, गेलो की वातावरण बदलतच
आता पैठण आणि आजूबाजूच्या परिसरात जाऊन संवाद यात्रा काढणार आहे. तसेच मी ओरिजिनल असून, स्वतः गेलो की, वातावरण बदलतच, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, शहाजीबापू पाटील यांनी आपल्या भाषणात खैरे आणि दानवे यांच्यावर टीका करताना, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासाठीही या ठिकाणी दोन खुर्च्या टाकायला हव्या होत्या, जेणेकरून सभेला गर्दी म्हणजे नेमके काय असते, ते समजले असते, असा खोचक टोला लगावला होता. याला उत्तर देताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, ही झाडी, हे डोंगर, हे फलाना याला काही अर्थ नाही. ते तात्पुरते आहे. काही दिवस चालणार. शहाजी बापू यांचे उद्धव ठाकरेंविषयीचे मत चांगले आहे. मात्र, त्यांना एवढेच सांगेन की, मला किंवा दानवेंना खुर्ची ठेवायचे सोडा. पुन्हा मातोश्रीवर चला. उद्धव ठाकरेंना सांगून तुम्हाला चांगली खुर्ची देतो, असे आवाहन खैरे यांनी केले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लहानपणापासूनच मोठे कष्ट उपसले आहेत. महाबळेश्वरच्या डोंगरातील, कोयना धरणाच्यावरली शेती ही तुमच्या-माझ्यासारखी नाही. त्या शेतीत बैलं चालत नाहीत, तिथे कुळव माणसानेच ओढायचा असतो, नांगुर सुद्धा माणसाचे धरायचा असतो. शिंदेसाहेबांनी स्वत: नांगुर ओढलाय. खांद्यावर दावं घेऊन कुळवं ओढलाय, चिखलात पाय बुडवून खाकी चड्डीवर भाताची रोप पेरल्याती, एवढं कष्ट करुनसुद्ध संसार चालत नाही म्हणून ते ठाण्याला गेले. तेथे धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने रिक्षा चालवायला सुरु केली. रात्रं-दिवस रिक्षा चालवून घराचा प्रपंच केला. म्हणूनच, एकनाथ शिंदे दिवसरात्र जागून काम करत आहेत. ज्या माणसाचे जीवनच जनतेच्या हितासाठी समर्पित झालेय, तो माणूस झोपणार नाही, असे म्हणत शहाजीबापू पाटीलांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली.