सकाळी सीएमसोबत वाजवला नगारा; संध्याकाळी उद्धव ठाकरेंचा स्वबळाचाच नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 08:25 PM2018-12-03T20:25:00+5:302018-12-03T20:31:01+5:30
मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंचे शिवसेना मंत्र्यांना आक्रमक होण्याचे आदेश
मुंबई: आज जवळपास दिवसभर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र होते. वाशिममधील एका कार्यक्रमात या दोघांनी सकाळी एकत्र नगारा वाजवला. मात्र संध्याकाळी स्वपक्षीय मंत्र्यांना अधिक आक्रमक होण्याचे आदेश देत उद्धव यांनी पुन्हा एकदा स्वबळाचाच नारा दिला. त्यामुळे सकाळी निर्माण झालेली युतीची शक्यता संध्याकाळ होताच मावळली.
आज संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर स्वपक्षीय मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री उपस्थित होते. आज सकाळपासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत होते. या दोघांनी कार्यक्रमात एकमेकांचं तोडभरुन कौतुक केलं. ही साखरपेरणी पाहून दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता निर्माण झाली होती. उद्धव यांनी संध्याकाळी बोलावलेल्या बैठकीत याबद्दलच चर्चा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांना आणखी आक्रमक होण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना दुष्काळी भागात जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुष्काळी भागाचे दौरे करा. तिथली परिस्थिती पाहा. सरकारी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते आहे का, याचा आढावा घ्या, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुखांनी मंत्र्यांना दिले. निवडणूक जवळ येत असल्यानं अधिकाधिक आक्रमक होण्याचा आदेशदेखील उद्धव यांनी दिला. या बैठकीत उद्धव यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेली युतीची चर्चा पुन्हा एकदा थांबली आहे.
आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उद्धव ठाकरे वाशिममध्ये होते. देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नगारारूपी वास्तूसंग्रहालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला हे दोन्ही नेते उपस्थित होते. यावेळी दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळत संत सेवालाल महाराजांच्या पवित्र भूमित नगारा वाजविला. त्यामुळे भाजपा-सेना युतीचा नगारा वाजल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.