Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 08:29 AM2019-11-28T08:29:56+5:302019-11-28T08:39:36+5:30
आज संध्याकाळी उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामुळे पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती सरकारमध्ये दिसेल. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचं संपादकपद सोडलं आहे. सामनाच्या संपादकपदी संजय राऊत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सध्या ते सामनाचे कार्यकारी संपादक आहेत.
शासकीय पदावर असताना वर्तमानपत्राच्या संपादकपदी राहता येत नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी सामनाच्या संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या संपादकपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सध्या कार्यकारी संपादकपदी असलेले संजय राऊत यांनी नेहमीच सामनामधून शिवसेनेची बाजू लावून धरली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला अंगावर घेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अग्रलेख, ट्विट्स, पत्रकार परिषदा घेत त्यांनी दररोज भाजपावर हल्ला चढवला होता. त्यामुळे त्यांची सामनाच्या संपादकपदी निवड होऊ शकते. गेली अनेक वर्ष त्यांनी कार्यकारी संपादकाची धुरा सांभाळली आहे.
उद्धव ठाकरेंपूर्वी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंकडे सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव यांनी संपादकपदाची सूत्रं होती घेतली. मात्र आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्यानं ते या पदावरुन दूर झाले आहेत. आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर उद्धव यांचा शपथविधी होईल. यंदा आदित्य यांच्या रुपात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या आखाड्यात दिसली. आता उद्धव यांच्या रुपात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती सरकारचं नेतृत्त्व करताना दिसेल.