Maharashtra Political Crisis: शिंदे गटाला धक्का! तानाजी सावंतांना ‘या’ पदावरुन हटवले; उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 01:12 PM2022-07-10T13:12:51+5:302022-07-10T13:13:54+5:30
Maharashtra Political Crisis: दुसरीकडे शिवसेनेचे परभरणीचे खासदार संजय जाधव एकनाथ शिंदे गटात दाखल होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अधिक सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत. तसेच बंडखोर आमदारांवर कारवाया करण्याचे सत्र सुरूच असून, आता बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्यावर शिवसेनेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तानाजी सावंत यांनी जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे गटातील बंडखोर शिवसेना आमदार यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेकडून तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हासंपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी संपर्कप्रमुख म्हणून अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त याबाबत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
थेट पक्षप्रमुखांनीच कारवाईचा बडगा उगारला
शिवसेनेतील तब्बल ४० आमदारांनी बंड केल्यामुळे मोठे खिंडार पक्षाला पडले आहे. एकीकडे डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून केले जात असताना दुसरीकडे बंडखोरांवर कारवाईचे सत्रही सुरू आहे. बंडखोरी झाल्यावर लगेचच शिवसेनेकडून १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. मात्र, यावरून शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. याची सुनावणी ११ जुलै रोजी आहे. यानंतर आता तानाजी सावंत यांच्यावर थेट पक्षप्रमुखांनीच कारवाईचा बडगा उगारला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसैनिकांना तानाजी सावंत यांच्या पुणे आणि सोलापूरमधील कार्यालयांची तोडफोड केली होती. त्यानंतर तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांना इशारा दिला होता. दुसरीकडे, एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेचे परभरणीचे खासदार संजय जाधव एकनाथ शिंदे गटात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. संजय जाधव हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंढरपूरमध्ये दिसून आले. महापूजा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंदिरातच संजय जाधव यांचा सत्कार केला.