काका होणार मुख्यमंत्री... पुतण्याची सक्रिय राजकारणात एन्ट्री; ठाकरे कुटुंबासाठी मोठा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 01:30 PM2019-11-28T13:30:52+5:302019-11-28T13:39:11+5:30
काका-पुतण्याच्या नवा वाटचालीला आजपासून सुरुवात
मुंबई/नवी मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्याचं नेतृत्त्व करणारे ते पहिले ठाकरे ठरणार आहेत. तर आदित्य यांच्या रुपात यंदा पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या आखाड्यात उतरली. त्यानंतर आज उद्धव मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्यानं आजचा दिवस ठाकरे कुटुंबासाठी ऐतिहासिक आहे. यासोबतच ठाकरे कुटुंबासाठी आज आणखी एक महत्त्वाची घटना घडली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आज पहिल्यांदाच आंदोलनात उतरले. आंदोलनाचं नेतृत्व करत ते पहिल्यांदाच राजकारणात सक्रिय झाले.
आज ठाकरे कुटुंबातील काका-पुतण्यानं नव्या वाटचालीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी शिवाजी पार्कात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. याआधी १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार होतं. मात्र त्यावेळी ठाकरे कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारमध्ये नव्हती. सत्तेत न जाता सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे ठेवायचं धोरण ठाकरे कुटुंबानं स्वीकारलं. मात्र आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करताना उद्धव यांनी सरकारमध्ये जात थेट मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ठाकरे कुटुंबासाठी आजचा दिवस खूप मोठा आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे पुतणे आणि राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच रस्त्यावर उतरले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली नवी मुंबईत महापालिका कामगारांच्या हक्कासाठी मनसेनं थाळीनाद आंदोलन केलं. पालिकेतील घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणीपुरवठा अशा १७ विविध विभागात कार्यरत असणाऱ्या ६,५०० कंत्राटी कामगारांना त्यांची १४ महिन्यांची थकबाकी (एकूण ९० कोटी रुपये) तसंच घंटागाडी कामगारांना त्यांची संपूर्ण ४३ महिन्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला. यावेळी मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.