एकीकडे मनधरणी तर दुसरीकडे पक्षनेतृत्वाचा कठोर बाणा: एकनाथ शिंदेंचा डाव उधळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 03:41 PM2022-06-21T15:41:27+5:302022-06-21T16:02:28+5:30
इतकेच नाही तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे सूरतला रवाना झाले आहे
मुंबई - शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी आता शिवसेना पक्षप्रमुखांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला केवळ १८ आमदार उपस्थित होते. या बैठकीत एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव स्वीकारू नका अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली. तर आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी शिवसेनेने खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे.
एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत समर्थक आमदारांची संख्या नेमकी किती आहे याची माहिती नाही. मात्र शिवसेनेने ३३ आमदार मुंबईत असल्याचा दावा केला आहे. त्याचसोबत इतर काही आमदारांशी संपर्क झाला आहे. या आमदारांना फसवून सूरतला नेण्यात आले आहे. त्यांना परत यायचं आहे. परंतु गुजरातमध्ये भाजपाने त्यांना अडकवलं आहे. लवकरच ते आमदार मुंबईत येतील. काही आमदारांच्या जीवाला धोका आहे. या आमदारांच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मुंबई पोलीस सुखरूप या आमदारांना परत आणतील असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
इतकेच नाही तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे सूरतला रवाना झाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी विशेष खबरदारी घेतली आहे. त्याचसोबत दुपारी ४ वाजता सर्व शिवसैनिकांना शिवसेना भवनाबाहेर जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा डाव उधळण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून जोरदार सुरू आहे.
एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री राजीनामा देणार?
सध्या सुरत येथे भाजपा नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा सुरू आहे. काही वेळाने याठिकाणी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसही पोहचणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिंदे यांच्याजागी अजय चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.