धाडीमागून धाडी सुरू आहेत, प्रत्येकाचा दिवस असतो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 09:15 AM2022-02-26T09:15:25+5:302022-02-26T09:16:40+5:30
भाजपशी आमची युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी, ‘तुम्ही देश सांभाळा आम्ही राज्य सांभाळतो’ असे सांगितले होते. पण आजकाल सगळेच त्यांना हवे आहे मग आम्ही काय फक्त धुणीभांडी करायची का? : उद्धव ठाकरे
मुंबई : ‘धाडीमागून धाडी सुरू आहेत, प्रत्येकाचे दिवस येतात’, या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवर केंद्र आणि भाजपला एका कार्यक्रमात बोलताना सुनावले. मुख्यमंत्री म्हणाले की पश्चिम बंगाल अन् महाराष्ट्र ही दोनच राज्ये केंद्रीय यंत्रणांना दिसत आहेत. तुम्हाला भ्रष्टाचार दिसतो ना, जरूर काढा, पण त्यामागे विकृतीची लागण दिसते. ही साथ पसरायची नसेल तर लवकरात लवकर बदल करावा लागेल.
जनतेचा आशीर्वाद नसताना सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणारच या केंद्र सरकारच्या वृत्तीमुळे राजकारण नासवून टाकले आहे आणि त्यातूनच केंद्र व राज्य संघर्ष सुरू झाला, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही काय धुणीभांडी करायची का?
भाजपशी आमची युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी, ‘तुम्ही देश सांभाळा आम्ही राज्य सांभाळतो’ असे सांगितले होते पण आजकाल सगळेच त्यांना हवे आहे मग आम्ही काय फक्त धुणीभांडी करायची का? त्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला हाणला. भाजपसोबत युतीच्या शक्यतेबाबत ते म्हणाले की भाजप आधी सुधारणार आहे का? त्यांची वैचारिक पातळी पाताळात गेली आहे. कुणाहीबरोबर जाण्याचा त्यांचाच कित्ता आम्ही गिरविला आहे.