विधानपरिषदेची तयारी सुरु! शिवसेनेचे ‘या’ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 03:43 PM2022-06-07T15:43:12+5:302022-06-07T15:44:33+5:30

एकीकडे राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे शिवसेना विधान परिषदेच्या तयारी लागल्याची चर्चा सुरू आहे.

shiv sena could declared sachin ahir amsha padvi names for mlc election vidhan parishad seat | विधानपरिषदेची तयारी सुरु! शिवसेनेचे ‘या’ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब? चर्चांना उधाण

विधानपरिषदेची तयारी सुरु! शिवसेनेचे ‘या’ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब? चर्चांना उधाण

googlenewsNext

मुंबई: एकीकडे राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीची मते फुटू नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलवर नेले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाजपसोबत झालेली बोलणी फिस्कटल्यामुळे राज्यसभा निवडणूक होणारच, हे निश्चित झाले. आता सगळी मदार अपक्षांवर असून, त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यसभेची निवडणूक १० जून रोजी होणार आहे. मात्र, यातच आता शिवसेनेने विधान परिषदेची तयारी सुरू केली असून, दोन नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे राज्यसभेचे चारही उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तीन आमदारांचे पाठबळ असलेल्या बहुजन विकास आघाडीला यात विशेष महत्त्व आले असून, महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भाजपकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. मग शिवसेनेच्या शिष्टमंडळाने हितेंद्र ठाकूर यांची विरारमध्ये जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता पुन्हा संकटमोचक म्हणून ओळख असणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.  

एकाला संधी, एकाचे पुनर्वसन करणार?

दुसरीकडे शिवसेनेने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी केली असून, २०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आणि आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर पाणी सोडणारे सचिन अहिर यांचे नाव शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी सर्वांत पुढे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या माध्यमातून सचिन अहिर यांचे शिवसेनेकडून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर, शिवसेना नेते आमशा पाडवी यांच्या नावाची चर्चाही आहे. २०१९मध्ये पाडवी यांना याच मतदारसंघात काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांच्याकडून अवघ्या २ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे राज्यसभा आणि विधानपरिषद या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे कोल्हापुरातून संजय पवार आणि अक्कलकुवातून आमशा पाडवी अशा स्थानिक नेतृत्वाला शिवसेनेकडून संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान, राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याच्या बदल्यात विधानपरिषदेची एक जागा भाजपसाठी सोडण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, ही चर्चा अपयशी ठरल्यानंतर राज्यसभा निवडणुका होणार असल्याचे निश्चित झाले. त्यापाठोपाठ विधानपरिषद निवडणुकांसाठी आता शिवसेनेकडून नावे निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.
 

Web Title: shiv sena could declared sachin ahir amsha padvi names for mlc election vidhan parishad seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.