Maharashtra Politics: “आंबेडकर-ठाकरे शक्तीचा उदय व्हावा हा शुभ संकेत, हीच महाराष्ट्रासह देशाची महाशक्ती ठरो!”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 08:58 AM2023-01-24T08:58:14+5:302023-01-24T08:59:00+5:30
Maharashtra News: प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या नेतृत्वास बदनाम करायचे व नंतर तुरुंगात ढकलायचे हेच मोदी सरकारचे धोरण आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण उदयास आले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेने एकत्र येऊन राजकारण तसेच समाजकारण करण्याचे ठरवले आहे व नव्या राजकीय पर्वाची ही नांदी आहे. महाराष्ट्रात नैतिकतेचे अधःपतन व स्वाभिमानाचा ऱ्हास सुरू असताना ‘आंबेडकर-ठाकरे’ या शक्तीचा उदय व्हावा हा शुभ संकेत आहे. शिवशक्ती व भीमशक्ती हीच महाराष्ट्रासह देशाची महाशक्ती ठरो!, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की, संक्रमणाच्या काळात राजकीय नेतृत्व घडत असतं. त्यामुळे महाराष्ट्र अथवा बाहेरील प्रादेशिक पक्ष स्वतःचं नेतृत्व व संघटन उभं करणार असतील तर त्यांना आम्ही मदत करणार आहोत. विवेक, नीतिमत्तेच्या बळावर राजकारण करण्याचा उद्धव ठाकरेंसह प्रयत्न करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात आंबेडकर-ठाकरे नावाला एक तेजस्वी संघर्षाचा इतिहास आहे. बेकायदेशीर मार्गाने मिळविलेल्या सत्तेच्या डळमळीत खुर्च्या टिकविण्यासाठी संविधानाचे टेकू लावले जात आहेत. ही एक प्रकारची हुकूमशाही आहे, अशी टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून केली आहे.
हुकूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी कुणीतरी दोन पाऊले पुढे यायला हवे होतेच
हुकूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी कुणीतरी दोन पाऊले पुढे यायला हवे होतेच. काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत वेगळे मत आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचेही या दोन पक्षांविषयी वेगळे मत होतेच व पुढे किमान समान कार्यक्रमांवर हे तीन पक्ष एकत्र आले व त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार चालवले. त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसला ऍड. आंबेडकरांची अडचण वाटण्याचे कारण नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.
भीमशक्तीबरोबर पुढचे पाऊल टाकायला हवे
दिल्लीतील सत्ता लोकशाही व स्वातंत्र्याचे सर्व संकेत पायदळी तुडवत आहे व आता त्यांनी न्यायालयांवरही ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. हे देशाच्या भवितव्यासाठी घातक आहे. या बुलडोझरखाली चिरडायचे नसेल तर मतभेद गाडून ऐक्याचा नारा देणे हाच पर्याय आहे. राहुल गांधी देशातील ‘नफरत’ म्हणजे द्वेषभावना मिटविण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा काढीत आहेत. त्याच भावनेने सगळय़ांनी जुनेपुराणे भेद गाडून भीमशक्तीबरोबर पुढचे पाऊल टाकायला हवे, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पैशाने सत्ता विकत घ्यायची, त्याच सत्तेतून पुन्हा पैसा व सत्ता या चक्रात महाराष्ट्र गुदमरला आहे. शोषित आणि वंचितांचे प्रश्न जेथच्या तेथे आहेत. दावोसवरून गुंतवणूक आणल्याच्या थापा मारल्या जात आहेत. प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या नेतृत्वास बदनाम करायचे व नंतर तुरुंगात ढकलायचे हेच मोदी सरकारचे धोरण आहे, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"