Maharashtra Politics: द्वेषपूर्ण भाषणांचे पीक अन् सुप्रीम कोर्टाची छाटणी! शिवसेनेने मोदी सरकारला चांगलेच सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 09:10 AM2022-10-25T09:10:56+5:302022-10-25T09:12:04+5:30
Maharashtra News: पंतप्रधान मोदी स्वपक्षीय वाचाळवीरांची कानउघाडणी करीत असले तरी सुप्रीम कोर्टाला ‘हातोडा’ मारण्याची वेळ का आली? असा सवाल शिवसेनेने केला आहे.
Maharashtra Politics: राज्यासह देशात अनेकविध मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच धर्मावरून आणि देवावरून द्वेषपूर्ण वक्तव्ये केली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली आहे. यावरून शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारला सुनावले आहे. पंतप्रधान मोदी स्वपक्षीय वाचाळवीरांची अधूनमधून कानउघाडणी करीत असले तरी सर्वोच्च न्यायालयाला ‘हातोडा’ मारण्याची वेळ का आली? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.
शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणांचा आधार घेत भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. द्वेषाची ‘पेरणी’ करूनच सत्ताकारणाची मशागत करण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. त्यातूनच द्वेषपूर्ण भाषणांचे पीक तरारले आहे. सर्वोच्च न्यायालयानेच आता त्याची ‘छाटणी’ केली हे बरेच झाले, असे शिवसेनेने म्हटले आहे.
२१ व्या शतकात आपल्या देशात हे काय सुरू आहे?
धर्माच्या नावावर आपण देवाला किती लहान केले आहे, असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहेत. द्वेषपूर्ण धार्मिक वक्तव्ये करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी स्वतःहून (स्युमोटो) कारवाई करावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. हे आदेश उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्ली सरकारला दिले असले तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश सर्वत्र लागू व्हावेत असे देशातील एकंदर वातावरण आहे, असे यात म्हटले आहे. तसेच ‘आपण देव कुठे नेऊन ठेवलाय?’ हा सर्वोच्च न्यायालयाने केलेला सवाल चुकीचा म्हणता येणार नाही. ‘हिंदुस्थान हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र २१ व्या शतकात आपल्या देशात हे काय सुरू आहे?’ असा परखड प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. देशात धर्मवादाचा घोडा बेलगाम हाकणाऱ्या सगळय़ांसाठीच हा प्रश्न बिनतोड आहे, असे शिवसेनेने नमूद केले आहे.
धर्माच्या नावावर आपण देवाला किती लहान केले आहे?
सण-उत्सव निर्बंधमुक्त उत्साहात साजरे होणे अपेक्षितच होते. मात्र त्यालाही विद्यमान सत्ताधाऱ्यांनी ‘हिंदुत्वा’चा मुलामा दिला आणि आम्हीच कसे हिंदुत्वाचे नवतारणहार असा देखावा निर्माण केला. स्वार्थी राजकारणासाठी देवाचाही असा वापर सर्रास होत आहे म्हणूनच ‘धर्माच्या नावावर आपण देवाला किती लहान केले आहे?’ असा जळजळीत सवाल सर्वोच्च न्यायालयाला करावा लागला. हिंदू धर्म, संस्कृती आणि हिंदुत्वाचा अभिमान असायलाच हवा, परंतु हा अभिमान इतरांचा द्वेष करायला लावणारा नसावा, असे सांगत, अभिमानाची जागा जेव्हा उन्माद घेतो तेव्हा देशातील एकोपा सर्वात आधी धोक्यात येतो, असे नमूद करत शिवसेनेने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, धर्म आणि देवाचा अर्थ आपापल्या सोयीनुसार लावायचा आणि त्या जोरावर राजकारण करायचे, असे सध्या देशात सुरू आहे. हिंदूंना भडकवायचे आणि त्या विद्वेषाच्या आगीत राजकीय पोळ्या भाजून घेण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल करत मागील दोन वर्षे कोरोनासारख्या महामारीने घातलेले थैमान आणि केंद्र सरकारनेच आखून दिलेल्या कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन यामुळे महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे, सर्वधर्मीय सण-उत्सवांवरील निर्बंध अपरिहार्य होते. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या या लोकहितकारी धेरणालाही ‘धार्मिक’ रंग देण्याचा प्रकार त्यावेळच्या विरोधकांनी केला होता. आता हीच मंडळी राज्यात सत्तेत आहेत आणि कोरोना निर्बंध पूर्णपणे उठले आहेत, या शब्दांत शिवसेनेने टीका केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"