Andheri Bypoll 2022: “शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला, विजयमार्ग स्पष्ट दिसतोय”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 08:00 AM2022-10-18T08:00:34+5:302022-10-18T08:02:53+5:30
Andheri Bypoll 2022: आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे. पेटलेली ही मशाल आता महाराष्ट्र आणि देश उजळवून टाकेल, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.
Andheri Bypoll 2022: अंधेरी पूर्वची पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला ही पोटनिवडणूक न लढवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यावरुन शिवसेनेने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढे पुढे पहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे. मशालीच्या अग्निप्रकाशात भविष्यातील शिवसेनेचे तमाम विजयमार्ग आम्हाला स्पष्ट दिसत आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयानंतर भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील. याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील! पेटलेली ही मशाल आता महाराष्ट्र आणि देश उजळवून टाकेल! या शब्दांत शिवसेनेने निशाणा साधला आहे.
पराभव झाला तर मोठी किंमत चुकवावी लागेल हे लक्षात आले
भाजप नेत्यांनी म्हणे दिल्लीशी चर्चा करून अंधेरीतील उमेदवार मागे घेतला. अर्थात भाजपचे माघारी नाटय़ हे दिसते तसे सरळ नाही. पराभव झाला तर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले असावे आणि शिवसेनेची मशाल जिंकणारच आहे याची खात्री भाजपला पटली असावी. शिवसेनेची ही ‘भडकलेली मशाल’ बेइमानीचे इमले जाळून टाकेल. त्यापेक्षा आता माघार घ्यावी हेच बरे, हा सुज्ञ विचार भाजप व मिंधे सरकारने केलेला दिसतो, असे शिवसेनेने म्हटले आहे.
या निर्णयाबद्दल आम्ही संबंधितांचे आभार मानीत आहोत
तरी या निर्णयाबद्दल आम्ही संबंधितांचे आभार मानीत आहोत. मशालीची सुरुवात चांगलीच झाली. अंधेरीतील याच मशालीचा प्रकाश आता संपूर्ण राज्याला उजळून टाकेल, असा विश्वास व्यक्त करताना शिवसेनेच्या विजयी मशालीने या पोटनिवडणुकीतील संकटे व अमंगलाचा नाश केला. भाजप… कारस्थानी आनंदीबाई… माफ करा, कमळाबाईंनी बेइमान ‘मिंधे’ गटास हाताशी पकडून जो घाव शिवसेनेवर, पर्यायाने महाराष्ट्रावर घातला, त्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नियतीनेच जणू अंधेरी पोटनिवडणुकीचे प्रयोजन केले होते, असेही शिवसेनेने यात म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेला ऊठसूट न्यायालयात जायला लावायचे. त्यात आमची शक्ती खर्ची पाडायची हे त्यांचे धोरण आहे. मिंधे गटास दूध पाजण्याचे हे प्रकार महाराष्ट्र बघत असला तरी मराठी जनता दूधखुळी नाही. योग्य वेळ येताच महाराष्ट्राच्या या सर्व पुतना मावशींना जनता आपटणार आहे. शिवसेनेला खतम करा, महाराष्ट्राला कमजोर करा, मुंबईचे लचके तोडा. अर्थात, महाराष्ट्रात सुरू असलेला पैशांचा आणि सत्तेचा लाजिरवाणा खेळ संपविण्यासाठी शिवसेनेची मशाल आता पेटली आहे. मशालीचे पावित्र्य आणि महत्त्व इतिहासकाळापासून आहे. दुष्मनांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी इतिहासकाळात मशालींचा वापर झाला होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मारकावरही मशाल अखंड धगधगत आहे, असे शिवसेनेने नमूद केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"