“अयोध्येत शिवसेनेचा धाक कायम, भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत येऊ शकता”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:30 PM2022-05-18T12:30:00+5:302022-05-18T12:31:21+5:30
अयोध्या दौऱ्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना डिवचले आहे.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackaray) यांनी जाहीर केलेल्या अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेतेही निशाणा साधत आहेत. मनसे आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोप तीव्र झालेले पाहायला मिळत आहेत. शिवसेनेने केलेल्या आरोपांना मनसेकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावरून डिवचले आहे. भीती वाट असेल, तर आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला येऊ शकता, असे ट्विट दीपाली सय्यदने केले आहे.
भाजप नेते आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा अद्यापही राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध आहे. राज ठाकरे यांनी माफी मागावी, मगच अयोध्येला यावे, या भूमिकेवर बृजभूषण सिंह ठाम आहेत. तर, दुसरीकडे मनेसच्या वतीने अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांची नावनोंदणी, रेल्वे आरक्षण या गोष्टींना सुरुवात करण्यात आली आहे. यातच दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या तीन वादळी सभांनंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेकडून राज ठाकरे यांना लक्ष्य केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
नेमके काय म्हणाल्या दीपाली सय्यद?
ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते शिवसेनेला नोटाचे राजकारण काय शिकवणार? जर भीती वाटत असेल तर अयोध्येत शिवसेनेचा धाक आजही कायम आहे, आदित्य ठाकरेंना विनंती करून सोबत येऊ शकता, माफी मागण्याची गरज लागणार नाही, असा टोला दीपाली सय्यद यांनी ट्विट करत लगावला आहे. तत्पूर्वी, राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेवरून दीपाली सय्यद यांनी हल्लाबोल केला आहे. सभा करायच्याच असतील तर आयोध्येत करून दाखवा... पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात, तेही जास्त गर्दी करून, अशी बोचरी टीका दीपाली सय्यद यांनी केली होती. शिवसेनेच्या तिकिटावर २०१९ मध्ये कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या दीपाली सय्यद या मागील काही दिवसांपासून राजकारणात पुन्हा एकदा चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत.
दरम्यान, यापूर्वीही दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केले असून, राज ठाकरे यांना सल्ला दिला आहे. मोदींना खूश करण्याकरिता जीवाचे रान करणाऱ्या राजसाहेबांनी अयोध्याच्या दौऱ्याकरिता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचित माफीनाम्याची गरज पडणार नाही, असा खोचक सल्ला देणारे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले होते.