“राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्यासाठी PM मोदींची मदत घ्यावी, माफीनाम्याची गरज पडणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 07:31 PM2022-05-12T19:31:08+5:302022-05-12T19:34:42+5:30
शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावरून टोला लगावला आहे.
मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केल्यापासून राजकीय वर्तुळात यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. युवासेना नेते आणि राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेही अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला मुंबई, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातून विरोध होताना पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी माफी मागावी, तरच अयोध्येत प्रवेश देऊ, अशी ठाम भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. यानंतर शिवसेनेने राज ठाकरेंवर अनेकदा खोचक टीका केली आहे. यातच आता राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदींची मदत घ्यावी. माफीनाम्याची गरज पडणार नाही, असा सल्ला शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केले असून, राज ठाकरे यांना सल्ला दिला आहे. मोदींना खूश करण्याकरिता जीवाचे रान करणाऱ्या राजसाहेबांनी अयोध्याच्या दौऱ्याकरिता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचित माफीनाम्याची गरज पडणार नाही, असा खोचक सल्ला देणारे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे.
राज ठाकरे यांच्या सभेपूर्वीही साधला होता निशाणा
राज ठाकरे आजपर्यंत कुठेही विजयी झालेले नाहीत, आता तरी विजयी व्हावेत. आता, तरी त्यांची सभा यशस्वी होऊन त्यानिमित्ताने विजय मिळो, असा चिमटा दीपाली सय्यद यांनी काढला होता. महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र नांदतात आणि सण साजरे करतात. राज ठाकरेंनी वक्तव्य केल्यानंतर भोंग्याचे जे राजकारण सुरू झाले, त्यात राणा दाम्पत्यांनीही उडी घेतली. राजकारण कोण कशासाठी करतोय हे सर्वांना ज्ञात आहे. कोण कोणाची एबीसीडी टीम आहे, हेदेखील माहिती आहे. काही हिंदू जातील राज ठाकरे यांच्याबरोबर तर काही मुस्लिम जातील ओवेसींबरोबर. पण, या राजकारणातून वाद, दंगली होणार आणि सर्वसामान्य नागरीक यात भरडला जाणार. त्यामुळे लोकांनीच विचार केला पाहिजे, असेही दीपाली सय्यद यांनी म्हटले होते.