शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर? नेत्यांमध्येच रंगली एकमेकांना शह देण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 06:35 AM2021-10-03T06:35:21+5:302021-10-03T06:39:07+5:30
शिवसेना नेत्याकडूनच सोमय्या यांना अनिल परब यांच्याविरोधात रसद?
हर्षल शिरोडकर
खेड, (जि. रत्नागिरी) : परिवहनमंत्री अनिल परब यांच्या बांधकामाविषयी माहिती काढून ती भाजप नेते किरीट सोमय्या यांना देण्याचे काम माजी मंत्री रामदास कदम यांनीच केले आहे, याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शनिवारी येथे केला.
यावेळी त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रसाद कर्वे आणि किरीट सोमय्या, तसेच प्रसाद कर्वे आणि रामदास कदम यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिपही सादर केली. ‘आता त्याची १०० टक्के वाट लागली, मेला तो...’ असे विधान रामदास कदम यांनी मंत्री परब यांच्याबाबत केल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट ऐकू येत असल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
माजी आमदार संजय कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत या ऑडिओ क्लिप सादर केल्या. कर्वेंमार्फत रामदास कदम यांनी परब यांच्या रिसॉर्टविषयी माहिती काढली. ही माहिती किरीट सोमय्या यांना पुरवून सरकार अस्थिर करण्याचा कदम यांचा प्रयत्न आहे, असा आरोप याआधीच या दोन नेत्यांनी केला होता. त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या आरोपाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी कर्वे व रामदास कदम तसेच कर्वे व सोमय्या यांच्या संभाषणाच्या क्लिपही ऐकवल्या.
दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी असलेल्या शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांच्या बांधकामाची तक्रार सोमय्या यांनी केली होती. पदाचा गैरवापर करून सीआरझेड क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने मुरूड येथील सर्वच व्यावसायिकांना नोटिसा पाठवल्या आहेत. या साऱ्यामध्ये रामदास कदम हे सोमय्या यांना मदत करत आहेत. त्यामुळे बँकांची कर्जे काढून व्यवसाय सुरू करणाऱ्या स्थानिकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शिवसेनेतील स्थान डळमळीत केले म्हणून रामदास कदम हे सोमय्या यांना माहिती पुरवत आहेत, असा आरोपही संजय कदम यांनी केला आहे. कर्वे यांनी या क्लिप खोट्या असून त्याविरोधात आपण कायदेशीर दाद मागणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
रामदास कदम हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष लागले आहे, असे संजय कदम म्हणाले.
तुळजा भवानीची शपथ... सोमय्यांशी संपर्क साधला नाही!
‘तुळजा भवानीची शपथ, सोमय्यांशी संपर्क साधला नाही’, असे रामदास कदम म्हणाले. या ध्वनिफितींशी माझा संबंध नसून, हे आरोप खोटे आहेत. अनिल परब माझे मित्र आहेत. आरोप करणाऱ्या दोघांनी कधी काळी माझ्या हाताखाली काम केले आहे. त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. संजय कदम यांना माझ्या मुलाने पराभूत केल्याने ते कुरघोड्या करण्याचे काम करत आहेत, असेही रामदास कदम यांनी सांगितले.