नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:59 AM2024-10-18T11:59:55+5:302024-10-18T12:29:02+5:30

भंडाऱ्यात कार्यकर्ता, पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांचा मेळावा घेत नाराजी व्यक्त करत पक्षाने तिकिट नाकारले तरी २८ किंवा २९ तारखेला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.

shiv sena eknath shinde faction mla narendra bhondekar will leave party preparing to contest independent electionsbhandara due to displeased on mahayuti | नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

भंडारा : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. जागावाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेतेमंडळी अनेक बैठका घेत आहेत. दरम्यान, या विधानसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अडीच वर्ष महायुती सोबत राहिल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या सरकारनं भंडाऱ्याच्या आमदारांची इच्छा पूर्ण केलेली नाही. त्यामुळे नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेने तिकीट नाकारले तरी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.

भंडाऱ्यात कार्यकर्ता, पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांचा मेळावा घेत नाराजी व्यक्त करत पक्षाने तिकिट नाकारले तरी २८ किंवा २९ तारखेला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले. दरम्यान, नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, मी अपक्षच आमदार निवडून आलो आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आग्रहामुळं मी शिवसेनेत प्रवेश केला आणि मुळात मी शिवसैनिकच आहे. त्यामुळे आगामी काळात मी घरी बसणार नाही. तर अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी माझी सुरू आहे. २०१९ मध्ये ज्या पद्धतीने अपक्ष निवडणूक लढली, तशीच आता कार्यकर्त्यांची इच्छा आहे. 

सध्या मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. सत्ता बदलाच्या वेळी सर्वात पहिले मी गेलो. त्यामुळे मला काय द्यायला पाहिजे, काय नाही द्यायला पाहिजे आणि का नाही दिलं? याचं उत्तर मुख्यमंत्री देतील. मला कार्यकर्त्यांच्या भावना बघून निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीकडून जिल्ह्याच्या विकासासाठी जी अपेक्षा होती, ते मिळालं नाही. याची मनात खंत आहे,  असेही आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले.

याचबरोबर, भाजपने निवडणूक लढण्याबाबत ठराव घेतला आहे. भाजपला माझा विरोध नाही. मी महायुतीच्या विचाराचा आहे, महायुतीसोबत राहिलो आहे. भाजपने उमेदवारी देण्याचे ठरवले असेल तर द्यावा, आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा जिल्ह्याला झुकतं माप दिलं नाही. राजकीय स्तर जो एक पाऊल समोर जायला पाहिजे होता, ती मदत व्हायला पाहिजे होती, जेणेकरून आम्हाला समाधान वाटलं पाहिजे होतं. मात्र तसे न झाल्याने आम्ही नाराज असल्याचेही नरेंद्र भोंडेकर म्हणाले. 

दरम्यान, राज्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरावेळी नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. अपक्ष आमदार असले तरी नरेंद्र भोंडेकर हाडाचे शिवसैनिक आहेत. २०१९ साली पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले होते.

Web Title: shiv sena eknath shinde faction mla narendra bhondekar will leave party preparing to contest independent electionsbhandara due to displeased on mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.