“युती तोडून, महाविकास आघाडीसोबत जाऊन आमच्या कपाळावर जो शिक्का..,” सत्तारांचं राऊतांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 09:19 PM2022-12-03T21:19:41+5:302022-12-03T21:20:08+5:30
“तुमच्या कपाळावर जो गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तो कधीही पुसला जाणार नाही,” असं राऊत म्हणाले होते.
काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतील काही आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपनं एकत्र येत राज्यात सरकारही स्थापन केलं. दरम्यान, यानंतर ठाकरे गटाकडून अनेकदा या आमदारांचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला. त्यातच खासदार संजय राऊत यांनी “तुमच्या कपाळावर जो गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तो कधीही पुसला जाणार नाही,” असं विधान केलं होतं. यावर आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलंय.
“२०१९ मध्ये यांनी युती तोडून आणि महाविकास आघाडी करून बसवलेला शिक्काच अजून मिटलेला नाही, तर नवीन कुठून येईल?” असा सवाल सत्तार यांनी केला. “त्यांच्या माथ्यावर जे लिहिलेलं आहे तेच आमच्या माथ्यावर २०१९ मध्ये महाविकास आघाडी करताना, ज्या युतीमध्ये आम्ही निवडून आलो आणि त्यांना धोका देऊन जे सरकार स्थापन केलं. त्यांना कदाचित पश्चाताप होत असेल तर तेच पराहावं. ते काही दिवस राहिले होते तेव्हा झाला असेल असं मला वाटतं,” असं सत्तार म्हणाले.
“भाजप आणि शिंदे साहेब एकमेकांच्या विश्वासाने निर्णय घेतात. त्यामुळे कोणीही नाराज नाही किंवा बॅकफुटवर नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री समन्वयाने सरकार चालवत आहेत. याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या निवडणुकामध्ये तुम्हाला दिसेल. या निवडणुकांमध्ये आमची पहिली परीक्षा होईल. मला वाटतं की फडणवीसांचा अनुभव आणि केंद्राचा मोठा पाठिंबा आम्हाला निधीच्या माध्यमातून मिळतोय. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपनं एकनाथ शिंदेंची निवड केली यासाठी मी त्यांचे आभार मानेन. चालत्या फिरत्या कार्यकर्त्यालाही मुख्यमंत्रिपद मिळू शकतं असा निर्णय मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलाय,” असं सत्तार यांनी नमूद केलं.