साधा शिवसैनिक वाढू नये यासाठी युतीत उपमुख्यमंत्रिपदही घेतलं नाही, केसरकरांचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 01:49 PM2022-08-20T13:49:18+5:302022-08-20T13:49:18+5:30
मुलांनी पाहिजे तर इतिहास वाचला पाहिजे. हा कोणत्याही राज्याला मोठं करत नाही. कोणीही गोबेल्स नीतीला बळी पडू नका -दीपक केसरकर
सध्या राज्याचं विधीमंडळाचं अधिवेश सुरू आहे. यादरम्यान काही आमदारांकडून शिंदे गटाच्या आमदारांवर टीका केली जात आहे. सध्या राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. साधा शिवसैनिक वाढू नये यासाठी युतीत असताना उपमुख्यमंत्रिपदही घेतलं नाही, असा मोठा आरोप त्यांनी केला. केसरकर यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
“भाजपनं तुम्हाला उपमुख्यमंत्रिपदही दिलं होतं. एखादा दुसरा मनुष्य, साधा शिवसैनिकही वाढू नये यासाठी युतीत असताना उपमुख्यमंत्रिपदही घेतलं नाही. मी याला साक्षीदार आहे. मुंबईत हे घडत असताना मी वर्षावरही होतो. मुंबईत महापालिकेवर भाजपचं बहुमत येण्याची शक्यता होती, तसं घडलंही असतं. देवेंद्र फडणवीसांनीउद्धव ठाकरेंचा मान राखला. त्यांनी जेव्हा एकमुखी पाठिंबा दिला. मराठी माणसाचा स्वाभिमान कसा राखला जाईल हे पाहिलं, त्यांच्याशी तुम्ही केलेल्याला काय म्हणायचं? मी सर्वसामान्य माणूस आहे आणि मोठ्यांचा आदर ठेवतो, म्हणून मी माझ्या तोंडानं त्या शब्दाचा उच्चार करत नाही. पण काय घडलं हे महाराष्ट्राच्या जनतेला कधी ना कधी कळलंच पाहिजे,” असे केसरकर म्हणाले.
“बंद खोलीत चर्चा करता, तेव्हा कोणती आश्वासनं देता आणि प्रत्यक्षात काय करता हे कळलं पाहिजे. मुलांनी पाहिजे तर इतिहास वाचला पाहिजे. हा कोणत्याही राज्याला मोठं करत नाही. कोणीही गोबेल्स नीतीला बळी पडू नका,” असंही ते म्हणाले. आम्ही एकही मिनिट थांबत नाही, काम करणारे कार्यकर्ते आहोत. ते काम करताना राजकारण करणार. महाराष्ट्राच्या हिताचं अडीच वर्षात काय केलं? आम्हालाही इश्वरानं जीभ दिली, विचार दिले. आम्ही आमचे विचार लोकांच्या चांगल्यासाठी वापरत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
गोबेल्स नीती यशस्वी होऊ देणार नाही
“आमचे मुख्यमंत्री दिवसरात्र काम करतात. त्यांच्यावर तुम्ही टीका करता, वाईट शब्द बोलता. आम्हाला बोलण्याचा अधिकार ज्यांनी निवडून दिलं त्या जनतेला आहे. आपण जर बोललो नाही तर लोकांना खरं वाटतं. त्यामुळे आमचा प्रवक्ता कोणत्या विषयावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला याबद्दल बोलेल. गोबेल्स नीती आहे ती महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही,” असंही केसरकर म्हणाले.