सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 07:24 AM2024-11-28T07:24:03+5:302024-11-28T07:32:33+5:30

"सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले," असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

shiv sena eknath Shinde withdrawal from the Chief Ministerial race son Srikanth Shinde emotional post | सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

Shiv Sena Shrikant Shinde ( Marathi News ) : मुख्यमंत्रि‍पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, अशी भूमिका घेत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून काल माघार घेतली. त्यामुळे राज्यात आता भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. "मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली.  ते स्वतःला  'सीएम' म्हणजे 'कॉमन मॅन' समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला," अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कारकीर्दीविषयी पुढे बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, "कारकीर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे. सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा," असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्रि‍पदावरून सुरू असलेल्या तिढ्यावर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी अचानक ठाणे येथे पत्र परिषद घेत मुख्यमंत्रि‍पदाबाबत आपली भूमिका जाहीर केली. "सर्वसामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती, ती इच्छा पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो घेतील तो शिवसेना म्हणून आम्हाला मान्य असेल. मी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना फोन केला होता. त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय होईल, त्यामध्ये माझा कोणताही अडसर नसेल. भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल," असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title: shiv sena eknath Shinde withdrawal from the Chief Ministerial race son Srikanth Shinde emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.