नाराजांची सेना! मंत्रिपदांवरून खदखद; डझनभर आमदार नाखूश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 03:49 AM2020-01-02T03:49:16+5:302020-01-02T06:46:59+5:30
बिगरशिवसैनिकांना मंत्री केल्याचा राग
मुंबई : मंत्रिपदावरून शिवसेनेत प्रचंड खदखद असून मंत्रिमंडळात डावलले गेलेले निष्ठावान शिवसैनिक नाराज आहेत. स्वत:ला मंत्रिपद मिळाले नाही, यापेक्षाही उपऱ्यांना संधी देण्यात आल्याचे शल्य त्यांना बोचत आहे. काही नाराज आमदारांनीच ही माहिती ‘लोकमत’ला दिली.
शंभूराज देसाई हे पश्चिम महाराष्ट्रातील जुने नेते आहेत. त्यांना राज्यमंत्रिपद दिले गेले तर शिवसेनेला पाठिंबा देणारे शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्री केले, याकडे आमदारांनी लक्ष वेधले. तीन-चारदा निवडून गेलेल्यांना संधी नाही आणि एकदाही विधानसभेवर निवडून न गेलेले अनिल परब यांना कॅबिनेट मंत्री केले हाही नाराजीचा प्रमुख मुद्दा आहे.
भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सात अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा होता; पण त्यापैकी एकालाही मंत्रिपद नव्हते. त्याचा फटका भाजपला बसला नाही. मग शिवसेनेने तीन जणांना आपल्या कोट्यातून मंत्रिपद का दिले, हा या आमदारांचा सवाल आहे. बच्चू कडू हे चौथ्यांदा निवडून आले. त्यांच्यासोबतचे मेळघाटचे राजकुमार पटेल यांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला. तरीही आपल्याला राज्यमंत्रीच केल्याने कडू नाराज असल्याचे समजते. राष्ट्रवादी, अपक्ष अन् मग शिवसेनेला पाठिंबा असा प्रवास केलेले राजेंद्र यड्रावकर यांना राज्यमंत्रिपद दिले नसते तर पक्षाचे काहीही नुकसान झाले नसते, उलट एखाद्या निष्ठावंताला संधी देता आली असती, असे आमदारांचे म्हणणे आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शंकरराव गडाख यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद दिले. मातोश्रीवर सातत्याने वावर असलेल्या एका व्यक्तीने आपले पूर्ण वजन वापरून गडाखांना मंत्री करण्यास भाग पाडले अशी माहिती आहे. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये मोठी खदखद आहे. आधी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भाजपच्या गळाला लागू पाहणारे गडाख यांना याच व्यक्तीने मातोश्रीवर नेले होते.
संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्री केल्याने यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी नाराज आहेत. त्यांचा या बाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संजय रायमूलकर किंवा गोपिकिशन बाजोरिया या पश्चिम विदर्भातील आमदारांपैकी किमान एकाला संधी द्यावी, अशी मागणी मी आणि बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली होती पण ती मान्य झाली नाही, अशी नाराजी गवळी यांनी बोलून दाखविली. काल शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्री केले आणि वर्षानुवर्षे औरंगाबाद, मराठवाड्यात किल्ला लढविणाऱ्यांना संधी मिळाली नाही, अशीही एक भावना आहे.
शिवसेनेत अचानक पुढे आलेले आणि मोठे प्रस्थ बनू पाहणारे तानाजी सावंत यांना डच्चू का मिळाला या बाबत वेगवेगळी चर्चा आहे. फडणवीस मंत्रिमंडळात शेवटच्या चार महिन्यात ते कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यावेळी काही ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाल्याने त्यांची वर्णी लागली अशी उघड चर्चा होती. अलिकडच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या हट्टापायी पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवाºया देण्यात आल्या. निष्ठावंतांना डावलून सावंत यांच्या सांगण्यानुसार उमेदवारी वाटप झाले. सावंत यांनी दिलेले बहुतेक उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे मातोश्रीवरील त्यांचे वजन कमी झाले असे म्हटले जाते. सावंत यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन त्यांची नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
संजय राऊत यांचे टिष्ट्वट निशाणा कोणावर?
मंत्रिमंडळ विस्तार समारंभाला हजर न राहिलेले खा. संजय राऊत यांनी आज एक टिष्ट्वट केले. या निमित्ताने त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला अशी चर्चा आहे. ‘हमेशा ऐसे व्यक्ती को संभाल के रखिये जिसने आप को ये तीन भेट दी हो... साथ, समय और समर्पण’ असे या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. पक्ष, पक्ष नेतृत्वास मी साथ दिली, वेळ दिला आणि समर्पणही दिले अशा व्यक्तीला सांभाळून घेतले गेले नाही, अशी खंत या निमित्ताने राऊत यांनी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे.
आपले बंधू सुनील राऊत यांना मंत्रिपद न दिल्याने खा. संजय राऊत नाराज असल्याचे म्हटले जात आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत यांनी रामदास कदम आणि सुनील राऊत यांना मंत्री करण्याचा आग्रह धरला होता. दोघांपैकी कोणाचीही वर्णी न लागल्याने उद्धव ठाकरे यांनी राऊत यांचे पंख छाटल्याची चर्चा आहे.
ही आहे नाराज सेना
‘आमची योग्यता कुठे कमी पडली,’ असा सवाल करीत भास्कर जाधव व प्रताप सरनाईक या आमदारांनी त्यांची नाराजी आधीच बोलून दाखविली आहे. तानाजी सावंत, अनिल बाबर, चिमणराव पाटील, चंद्रकांत शिंदे, सुनील प्रभू, सुनील राऊत, प्रकाश आबिटकर,
आशिष जैस्वाल, भरत गोगावले हेही ‘नाराज’सेनेत असल्याचे म्हटले जाते.