...तरी शिवसेना सगळ्यांना पुरून उरली - उद्धव ठाकरे

By Admin | Published: March 9, 2017 07:31 AM2017-03-09T07:31:46+5:302017-03-09T07:47:56+5:30

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकला आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुंबईच्या जनतेचे आभार मानले आहेत.

Shiv Sena is full of all time - Uddhav Thackeray | ...तरी शिवसेना सगळ्यांना पुरून उरली - उद्धव ठाकरे

...तरी शिवसेना सगळ्यांना पुरून उरली - उद्धव ठाकरे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 9 -  मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकला आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुंबईच्या जनतेचे आभार मानले आहेत. मुंबईच्या जनतेच्या पाठबळावरच सलग पाचव्यांदा शिवसेना विजयी झाली. आम्ही सदैव ते ऋण मानू व मुंबईकरांची उत्तम सेवा करून त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासनही त्यांनी जनतेला दिले आहे. 
 
दरम्यान, महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसनेही उमेदवार दिला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. 'अपशकुन करण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी शिवसेना सगळ्यांना पुरून उरली', असा टोला उद्धव यांनी काँग्रेसला हाणला आहे. 
(मनगटातील जोर दाखवला...)
 
नेमके काय आहे सामना संपादकीमध्ये?
मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. शिवसेनेच्याच हेमांगी वरळीकर उपमहापौरपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या. निवडणुकीची तशी गरज नव्हती. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या रिंगणातून आधीच माघार घेतली व त्यांच्या ‘८२’ पहारेकऱ्यांनी शिवसेनेच्या उमेदवारास पाठिंबा दिला. त्यामुळे ३१ सदस्य असलेल्या काँग्रेसने निवडणूक लढविण्याचा हट्ट मागे घेऊन निवडणूक टाळायला हवी होती, पण कुणाचे काय व कुणाशी ‘सेटिंग’ असेल ते सांगता येणार नाही आणि तो त्या झालेल्या सेटिंगनुसारच पावले टाकीत असतो. हे आम्ही यासाठीच सांगतोय की, ठाणे महापौरपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली व निवडणूक बिनविरोध होऊ दिलीच ना, पण जे ठाण्यात केले ते मुंबईत करायचे नाही! यामागे नक्कीच कुणाच्या तरी सडक्या खोपडय़ा आहेत. अर्थात अशा सडक्या खोपडय़ांची पर्वा न करता शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौर विजयी झालेच. अपशकुन करण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी शिवसेना सगळ्यांना पुरून उरली. महापौरपदाची निवडणूक ९ तारखेस ठरल्याप्रमाणे होणारच होती. कारण मावळत्या सभागृहातील नगरसेवकांची मुदत ८ तारखेपर्यंत होती, पण तरीही निवडणूक ८ तारखेला घेण्याचा अट्टहास झाला. त्या मागेही कुणाची काय आकडेमोड असायची ती असेल. त्या सगळ्यांना मोडून शिवसेना जिंकली हे महत्त्वाचे. मुंबईशी शिवसेनेचे जे नाते आहे ते फक्त सत्ता उबवण्यापुरते नाही. शिवसेना नसती तर मुंबईचे काय झाले असते? मुंबई महाराष्ट्रात राहिली असती काय? या प्रश्नांची उत्तरे नव्याने देण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या नकाशावर मुंबई पाय रोवून उभी आहे ती शिवसेनेच्या जागत्या पहाऱ्यामुळेच. मुंबईसाठी शिवसेनेने हल्ले पचवले तसेच हल्ले परतवलेसुद्धा. त्यामुळे मुंबईच्या भविष्याचा विचार करण्याचा अधिकार परंपरेने शिवसेनेला मिळाला आहे. दिल्लीतील व महाराष्ट्रातील राजकारण्यांनी मुंबईची तशी शोकांतिकाच केली आहे. मुंबईच्या लोकसंख्येचा ताण नागरी सुविधांवर पडतो आहे. ज्या सुविधा ५० लाख जनतेसाठी आहेत त्या दीड कोटी लोकसंख्येला पुरवाव्या लागतात. याचा दोष महानगरपालिकेस देणे हा अन्याय आहे. मुंबईत फक्त बेकायदेशीर झोपड्याच उभ्या राहतात असे नव्हे तर पक्की बांधकामेदेखील नियम धाब्यावर बसवून उभी राहतात. सर्वच जण त्यात हात धुऊन घेतात. हे सर्व रोखण्याची जबाबदारी फक्त महानगरपालिकेची नाही. मुंबई शहराचे ‘मनी सेंटर’मध्ये रूपांतर करण्याचा डाव ज्यांनी रचला त्यांनीच मुंबईच्या मराठी संस्कृतीला व अस्मितेला चूड लावली. गिरण्यांच्या संपामुळे चिंचपोकळी, करी रोड, परळ, लालबाग हा भाग रिकामा झाला. बाहेरच्या प्रांतांतून आलेल्या धनिकांनी तो विकत घेतला. दोन मजल्यांच्या चाळीवर ५० माळ्यांचे टॉवर उभे राहिले. या टॉवरवाल्यांनीच मुंबईचे रक्त व प्राणवायू शोषून घेतले. त्यांनाही शेवटी पाण्यापासून सांडपाण्यापर्यंत सर्व सुविधा मुंबईची महानगरपालिकाच पुरवते. मात्र हेच लोक शिवसेना काय करते? असे प्रश्न विचारतात. केंद्राची मदत नाही, राज्य सरकारचे पाठबळ नाही अशा परिस्थितीतही शिवसेनेने गेली २० वर्षे मुंबई महानगरपालिकेचा उत्तम कारभार केला. या कारभाराची खरी पहारेकरी कोणी असेल तर ती मुंबईची जनता. त्या जनतेच्या पाठबळावरच सलग पाचव्यांदा शिवसेना विजयी झाली. आम्ही सदैव ते ऋण मानू व मुंबईकरांची उत्तम सेवा करून त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू!

Web Title: Shiv Sena is full of all time - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.