“रोहित पवार आमचा पक्ष फोडतायत, शरद पवारांकडे तक्रार करेन”; शिवसेना नेत्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 11:25 AM2022-05-30T11:25:31+5:302022-05-30T11:27:23+5:30
आमच्या कार्यकर्त्यांची कोंडी करून, दबाव आणून पक्ष सोडायला लावायचा, हे प्रकार तुम्हाला शोभणारे नाहीत, या शब्दांत शिवसेना नेत्याने रोहित पवारांना खडेबोल सुनावले.
नगर:महाविकास आघाडीमधील अंतर्गत नाराजी अनेकदा चव्हाट्यावर आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एकीकडे भाजपला दूर ठेवण्यासाठी एकत्र येण्याची भाषा करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांची धूसपूस समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांवर दबाव आणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडले जात आहेत. हे प्रकार थांबले नाहीत, तर वेळ पडल्यास शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा शिवसेना नेत्याने दिला आहे.
रोहित पवार यांच्याकडून नगर जिल्ह्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सुरुंग लावला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी केला आहे. शिवसेनेकडून राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरु आहे. या अभियानासाठी गजानन किर्तीकर हे नगरमध्ये गेले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना किर्तीकरांनी राष्ट्रवादीवर मोठे आरोप केले आहेत.
या सगळ्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे करेन
रोहित पवार यांनी स्वत:चा पक्ष वाढवावा. त्यांना तो अधिकार आहे, आम्हीदेखील याठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी आलो आहोत. परंतु प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी निधी मिळून द्यायचा नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कोंडी करून, त्यांच्यावर दबाव आणून त्यांना पक्ष सोडायला लावायचा, हे प्रकार तुम्हाला शोभणारे नाहीत. तुम्ही शरद पवार यांचे नातू आहात. उद्या वेळ पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून या सगळ्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे करेन. शरद पवार यांनाही हा प्रकार मंजूर नसेल. तेदेखील रोहित पवार यांना चार शब्द सुनावतील, असे गजानन किर्तीकर यांनी म्हटले आहे.
रोहित पवार महाविकास आघाडीचा धर्म पाळणार नसतील तर...
रोहित पवार महाविकास आघाडीचा धर्म पाळणार नसतील तर आम्हीही बांधील नाही, अशी ताकीद किर्तीकर यांनी यावेळी दिली. रोहित पवार हे नगरमध्ये शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर दबाव आणतात. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायला सांगतात. ही पळवापळवी आहे. रोहित पवार यांनी हे धंदे बंद करावेत, असे गजानन किर्तीकर यांनी म्हटले. तसेच शिवसेनेच्या वाट्याचा जिल्हा नियोजनाचा निधीही आम्हाला दिला जात नाही. यासंदर्भात मी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहणार आहे. आम्हाला आमच्या वाट्याचा निधी मिळालाच पाहिजे, असे गजानन किर्तीकर यांनी स्पष्ट केले.