संजय राठोडांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेला मिळाला मोहरा; उद्धव ठाकरेंची खेळी
By नंदकिशोर नारे | Published: September 30, 2022 02:39 PM2022-09-30T14:39:52+5:302022-09-30T14:40:28+5:30
मराठवाडामधील बंजारा नेते रविकांत राठोड यांनी सुद्धा त्यांचे सोबत शिवबंधन बांधले
वाशिम - मानोरा तालुक्यातील बंजारा काशी म्हणून प्रख्यात असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी ३० सप्टेंबर रोजी मुंबई येथील उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर अखेर शिवसेनेत प्रवेश घेतला. अनेक दिवसापासून सुनील महाराज शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चेला या प्रवेशाने पूर्णविराम मिळाला.
यावेळी मराठवाडामधील बंजारा नेते रविकांत राठोड यांनी सुद्धा त्यांचे सोबत शिवबंधन बांधले. गेल्या अनेक दिवसंपासून सुनील महाराज हे शिव बंधन बांधणार अश्या बातम्या येत होत्या. महंत सुनील महाराज यांनी शिवबंधन बांधल्यामुळे एक बंजारा समाजात शिवसेनेला नवीन नेता सापडला आहे. मंत्री संजय राठोड याना हा पर्याय असल्याचे बोललं जात आहे. सुनील महाराज यांच्या शिवसेना प्रवेशाने लोकसभा व विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरण बदलणार असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आज बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज व राज्यातील बंजारा समाजाच्या प्रमुख सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. pic.twitter.com/KKXSZBaUNo
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) September 30, 2022
काय म्हणाले सुनील महाराज?
आज पंचमीची यात्रा असून पोहोरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. संपूर्ण राज्यात १.५ ते २ कोटी बंजारा समाजबांधवांना न्याय देण्यासाठी आम्ही खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत. कारण, शिवसेनाच बंजारा समाजाला न्याय देऊ शकते, सत्तेत वाटा देऊ शकते, असे सुनील महाराज यांनी पक्षप्रवेशावेळी म्हटलं.
उद्धव ठाकरेंनी साधला राठोडांवर निशाणा
साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा..असे आपण म्हणतो. नवरात्रीच्या मुहूर्तावर बंजारा समाजातील महंतांनी शिवसेनेत प्रवेश केला, मी त्यांचं स्वागत करतो. बंजारा समाजातील कडवट शिवसैनिक आजही आमच्यासोबत आहेत. कारण, शिवसेनेनं ज्यांना मोठं केलं, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. पण, बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही, त्यामुळे हा समाज आमच्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"