...पण काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेला वेळ होता; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 05:03 PM2019-11-08T17:03:22+5:302019-11-08T17:09:40+5:30
शिवसेनेशी युतीसाठी मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. मात्र, त्यानी ते घेतले नाहीत असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला.
मुंबई : सरकार बनविण्याचे सगळे मार्ग खुले आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. लोकांनी महायुतीला मतदान केले होते. असे वक्तव्य त्यांनी का केले, असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे सांगत काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
शिवसेनेशी युतीसाठी मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. मात्र, त्यानी ते घेतले नाहीत असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला. तसेच त्यांच्या आजुबाजुचे लोक जे वक्तव्ये करतात त्यामुळे सरकार बनत नाही. असे समजू नका की आम्ही प्रत्यूत्तर देऊ शकत नाही. तुमच्या भाषेपेक्षा जास्त प्रभावी भाषा आम्ही वापरू शकतो. पण आम्ही असे करणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी पूजनिय आहेत. भाजपाच्या कोणत्याही नेत्याकडून त्यांचा अपमान होणे शक्य नाही. गेल्या पाच वर्षांत विरोधात लढलो तेव्हाही आमच्या नेत्यांनी टीका केली नाही. अगदी नरेंद्र मोदींनीही नाही. पण गेल्या पाच वर्षांत आणि गेल्या 10 दिवसांत मोदींवर शिवसेनेकडून खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. दोन्ही ठिकाणी सत्तेत रहायचे आणि टीका करायची आम्हाला कधीही मान्य नाही. मोदीवर अशा प्रकारची काँग्रेसनेही केली नाही. ही टीका आमच्या जिव्हारी लागली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
मोदींविरोधात असे शब्द वापरणे सुरूच राहणार असेल तर सरकार कशाला चालवायचे असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे फडणवीस म्हणाले. शिवसेनेच्या नेत्यांना आमच्याशी चर्चा करण्यास वेळ नाही पण काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेला वेळ होता. अगदी दिवसाला तीन तीन वेळा ते जात होते. काही नेते पैसे देण्याचा आरोप करत आहेत. त्यांनी पुरावा आणून द्यावा, अन्यथा माफी मागावी, असे खुले आव्हान फडणवीस यांनी दिले.
तसेच महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करू शकलो नसल्याचे शल्य सांगतानाच पुढील सरका भाजपाचेच असेल असेही फडणवीस म्हणाले.
अडीज वर्षांचे काही बोलणे नाहीच...
अडीज वर्षांचा जो काही विषय आहे. स्पष्ट सांगतो माझ्यासमोर ही चर्चा झालीच नाही. बोलणीवेळीही हा विषय झाला नव्हता. त्यामुळे दिवाळीच्या वेळच्या अनौपचारिक चर्चेत तसे बोललो. उद्धव ठाकरे यांती अमित शहा यांच्याशी बोलले असतील तर मला माहिती नाही. शहा, मोदी यांना विचारले असता त्यांनीही या विषयावर बोलणे झाले नसल्याचे म्हटले आहे.