शिवसेनेपेक्षा भाजपा ४० जागा जास्त घेणार, २५ विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 05:59 AM2019-08-26T05:59:42+5:302019-08-26T10:54:37+5:30
युतीचे जागावाटप : मित्रपक्षांसह भाजप लढविणार १६८ जागा; नेत्यांच्या गुप्त बैठकीत ठरले सूत्र
- अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येत्या विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप-शिवसेना प्रत्येकी १४४ जागा लढविणार असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येत असले तरी, मित्रपक्षांसह भाजप १६३ ते १६८ जागांसाठी आग्रही असून शिवसेनेला केवळ १२० ते १२५ जागांवर समाधान मानावे लागेल, असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, युतीच्या जागावाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रत्येकी दोन बैठका झाल्या आहेत. दोन्ही बैठका वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या असून त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. विद्यमान ६३ आमदारांसह आणखी तेवढ्याच, साधारणपणे १२० ते १२५ जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील. १६३ ते १६८ जागा भाजप आणि मित्रपक्षांना मिळतील. तर भाजप विद्यमान १२२ आमदारांसह मित्रपक्षांसाठी १६३ ते १६८ जागांसाठी आग्रही आहे. तसेच भाजप २५ ते ३० विद्यमान आमदारांना वगळणार असून नवीन चेहऱ्यांना (इनकमिंग) संधी देणार असल्याचे समजते.
शिवसेना कोणत्याही परिस्थितीत वेगळे लढण्याच्या मानसिकतेत नाही. तसा विचार झालाच तर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडेल अथवा शिवसेनेचे काही आमदार भाजपच्या तिकिटावर उभे राहतील, अशी भीती शिवसेनेच्या नेत्यांना आहे. मध्यंतरी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘‘आपल्याकडे कोणत्याही ८० जागा द्या, मी त्या निवडून आणतो, नाही आणल्या तर मला मंत्रीपद देऊ नका’’ असे आव्हान जाहीरपणे स्वीकारले आहे. त्यावर ‘आमच्या दोन जागा जास्ती घ्या, पण आम्हाला तुमचे गिरीश महाजन द्या’, असे उद्धव ठाकरे यांनी उपरोधिकपणे म्हटले होते.
युती नको, भाजपमधील ज्येष्ठांचा आग्रह
भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांचा एक गट किमान १७० जागा भाजपने लढवल्या पाहिजेत यासाठी आग्रही आहे. शिवसेनेसोबत युती नको, असा या गटाचा आग्रह आहे. मात्र मुख्यमंत्री युतीसाठी आग्रही असून किमान १६५ जागा भाजपला मिळतील, असा विश्वास त्यांनी पक्षातील ज्येष्ठांकडे व्यक्त केल्याचे समजते.