शिवसेनेने मुंबईची वाट लावली
By admin | Published: January 21, 2017 12:37 AM2017-01-21T00:37:00+5:302017-01-21T00:37:00+5:30
मुंबई शहरावर गेली २२ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेने मुंबई शहराची वाट लावली
कणकवली : मुंबई शहरावर गेली २२ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेने मुंबई शहराची वाट लावली, असा आरोप काँग्रेस नेते आमदार नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
राणे म्हणाले, मुंबई शहरावर गेली २२ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेने मुंबई शहराची वाट लावली. ही पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा असल्याचे मत भाजपाचे नेतेच व्यक्त करतात आणि आता युती करण्यासाठी म्हणे बोलणी करीत आहेत. एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या या दोन्ही पक्षांची मिलीभगत असून, आम्ही मतदारांना आणि नागरिकांना तेच पटवून देणार आहोत. महापालिकेसाठी जरी सेना-भाजपा या दोघांची युती झाली तरी काँग्रेसचा विजय कोणी रोखू शकत नाही.
उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या काळात गेल्या २0 वर्षांत मुंबईतील नागरिकांवर किती कर लावले याची माहिती आधी घ्यावी. त्यानंतरच त्यांनी त्याबाबत भाष्य करावे. तसेच नेमके कोणते कर कमी करणार हे त्यांनी सांगावे; मात्र त्यांना दूरदृष्टीच नाही. त्यामुळे ते याबाबत काय सांगणार? मुंबईतील नाले, गटार, रस्ते अशा सर्वच कामांत भ्रष्टाचार झाला असून, शिवसेना, भाजपा त्याला जबाबदार असून, फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते आता एकमेकांवर आरोप करीत आहेत. (प्रतिनिधी)
>शेकाप उमेदवाराला पाठिंबा नाही
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी माझा पाठिंबा असणार नाही. शेकाप जरी विरोधी पक्ष असला तरी शिवसेना, भाजपाशी त्यांचा अंतर्गत संबंध आहे, असेही राणे यांनी या वेळी सांगितले.