Maharashtra Political Crisis: “अनैसर्गिक आघाडीमुळे खासदार अस्वस्थ; शिवसेनेचा घात झाला, पण एकनाथ शिंदे...”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 01:46 PM2022-07-19T13:46:23+5:302022-07-19T13:47:31+5:30
Maharashtra Political Crisis: आता एकनाथ शिंदेंसोबत आम्ही जाणार असल्याने शिवसेना टिकून राहील, असा विश्वास खासदाराने व्यक्त केला आहे.
Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यातच आता अनैसर्गिक आघाडीमुळे खासदारांमध्ये अस्वस्थता, शिवसेनेचा घात झाला. पण आता एकनाथ शिंदे शिवसेनेला वाचवण्यासाठी पुढे आले आहेत, अशी प्रतिक्रिया सेना खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने काँग्रेस आणिर राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनैसर्गिक आघाडी केली. यामुळे खासदारांमध्येही अस्वस्थता होती. ही स्थिती एक दिवस शिवसेनेचा घात करेल, असे वाटत होते. पण तसेच घडले. मात्र एकनाथ शिंदे हे शिवसेनेला वाचवण्यासाठी पुढे आले असून त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे, असे नाशिकचे बंडखोर खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदेंसोबत आम्ही जाणार, शिवसेना टिकून राहील
शिवसेनेच्या १२ खासदारांनी आपला गट असल्याचे जाहीर करून राहुल शेवाळे यांना आपला गटनेता म्हणून निवडले आहे. आज लोकसभा अध्यक्षांनी खासदारांनी भेट घेतली. लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर खासदार हेमंत गोडसे बोलत होते. आता एकनाथ शिंदेंसोबत आम्ही जाणार असल्याने शिवसेना टिकून राहील, असेही ते म्हणाले. अडीच वर्षांपूर्वी अनैसर्गिक सरकार आलं. त्यावेळी अनेक वेगळे अनुभव आले. एकनाथ शिंदेंनी पहिले पाऊल टाकले आणि त्यांना आता प्रतिसाद मिळू लागला आहे. आम्ही सर्व १२ खासदारांनी गटनेतेपद शेवाळे यांना द्यावे, हीच मागणी केली आहे. लोकसभा अध्यक्षांचा निर्णय झाल्यावर पुढील भूमिका स्पष्ट करू, असेही हेमंत गोडसे यांनी सांगितले. ते टीव्ही९शी बोलत होते.
दरम्यान, लोकसभेत शिवसेनेच्या १२ खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचे हेमंत गोडसेंनी सांगितले. तसेच हे बंड करण्यामागील भूमिकाही त्यांनी सांगितली. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत. बाळासाहेबांच्या विचारांना जुळवून घेत आम्ही शिंदे यांच्यासोबत जात आहोत. आमचा गट वगैरे नाही. खासदारांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आहे. आमचे गटनेते याआधी विनायक राऊत होते, असे ते म्हणाले.