शिवजयंतीला शिवसेना करणार भाजपाला 'जय महाराष्ट्र'?

By Admin | Published: February 9, 2017 02:04 PM2017-02-09T14:04:17+5:302017-02-09T14:04:17+5:30

शिवसेना सर्वात मोठी राजकीय खेळी करणार असल्याचा दावा करणारा...

Shiv Sena to Jai Maharashtra, Shiv Sena to BJP? | शिवजयंतीला शिवसेना करणार भाजपाला 'जय महाराष्ट्र'?

शिवजयंतीला शिवसेना करणार भाजपाला 'जय महाराष्ट्र'?

googlenewsNext
>सागर सिरसाट / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे.  रोज दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर नवनवे आरोप केले जात आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसनेने भाजपाशी फारकत घेतल्यानंतर मंगळवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. 
 
शिवसेनेच्या मंत्र्यांसह कार्यकर्तेही भाजपाच्या 'दादा'गिरीला वैतागले आहेत. जाहीरपणे काही नेत्यांनी तसं बोलुनही दाखवलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही फडणवीस सरकारचा नोटीस पीरेड सुरू असल्याचे वक्तव्य केले होते.  गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेकडून आणि शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रातून मोदी सरकार, फडणवीस सरकार आणि भाजपा नेतृत्वावर अत्यंत कडवत भाषेत टीका केली जात आहे. 
 
भाजपाला शह देण्यासाठी गुजरातमधील भाजपा सरकारविरुद्ध आंदोलनाचे रणशिंग फुंकणारा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेललाही शिवसेनेने सोबत घेतलं. मातोश्रीवर जाऊन त्याने उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. हार्दिक आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी  मुंबई महानगरपालिकेत युती तुटल्यानंतर आता शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आम्ही त्यांना आपलं मानल्यानंतर पलिकडून कसा प्रतिसाद मिळतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही त्यांच्यासोबत होतो. विधानसभेत त्यांनी युती तोडली. आता महापालिकेत आम्ही युती तोडली. एखाद्या गोष्टीत मनच रमत नसेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. म्हणून या राजकारणाला पूर्णविराम द्यायची आवश्यकता आहे.”असं म्हणत त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचं सुचक वक्तव्य केलं होतं. 
 
त्यामुळे शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार या चर्चेला चांगलंच उधाण आलंय. काल रात्री उशीरा शिवसेनेचे मंत्री थेट वर्षावर पोहोचले होते. तेव्हाही सेनेचे मंत्री राजीनामा देत असल्याची चर्चा झाली.  यासर्व पार्श्वभूमिवर सध्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज चांगलाच व्हायरल झालाय. 
 
येत्या 18 फेबुवारीला शिवसेना सर्वात मोठी राजकीय खेळी करणार असल्याचा दावा करणारा हा मेसेज आहे. 
 
काय आहे हा मेसेज-
''येत्या 18 फेबुवारीला म्हणजे शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शिवसेनेची एक सभा होणार आहे. या सभेत शिवसेनेचे सर्व मंत्री राजीनामा देणार असून शिवजयंतीच्या दिवशी राज्यपालांकडे सर्वांचा राजीनामा पाठवण्यात येणार आहे.''
 
अर्थात सेनेच्या नेत्यांनी याला अजूनही पुष्टी दिलेली नाही. पण शिवसैनिकांच्या ग्रुपमधूनच हा मेसेज व्हायरल करण्यात आल्याची चर्चा आहे.  सध्याचं राज्यातील तापलेलं राजकारण पाहता शिवजयंतीला शिवसेना भाजपाला आणि पर्यायाने सरकारला जय महाराष्ट्र करण्याची शक्यताही नाकारली जाऊ शकत नाही. 
 
 
 

Web Title: Shiv Sena to Jai Maharashtra, Shiv Sena to BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.