शिवसेना - भाजपात पुन्हा जुंपणार

By admin | Published: April 16, 2017 03:07 AM2017-04-16T03:07:55+5:302017-04-16T03:07:55+5:30

महापालिका निवडणुकीनंतर एकमेकांविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा एकदा जुंपणार आहे. उभय पक्षांचे गच्चीवर रेस्टॉरंट आणि रात्र

Shiv Sena - Junket again in the BJP | शिवसेना - भाजपात पुन्हा जुंपणार

शिवसेना - भाजपात पुन्हा जुंपणार

Next

मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर एकमेकांविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा एकदा जुंपणार आहे. उभय पक्षांचे गच्चीवर रेस्टॉरंट आणि रात्र बाजारपेठ हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेच्या महासभेपुढे एकाचवेळी मंजुरीसाठी आले आहेत. मात्र दोन्ही पक्षांमध्ये जवळपास समान संख्याबळ असल्याने आपल्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी शिवसेना-भाजपाची विरोधी पक्षांवर मदार असणार आहे.
युवराज आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेले नाइट लाइफचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी जिवाचे रान केले. परंतु, भाजपाने नाइट लाइफचा भाग असलेल्या गच्चीवर रेस्टॉरंटचा प्रस्ताव विरोधी पक्षांच्या मदतीने बराच काळ लटकावला. यामुळे युती असतानाही या मित्रपक्षांमध्ये वाद रंगला होता. या वादातच २०१५पासून हे प्रस्ताव लांबणीवर पडले. मात्र निवडणुकांनंतर सत्तेवर आलेल्या शिवसेनेने युवराजांचा शब्द खरा करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.
त्यानुसार सुधार समितीत मंजूर झालेला ‘गच्चीवरील हॉटेल’ हा शिवसेनेचा प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी येतो आहे. मात्र त्याचवेळी भाजपाचा हाँगकाँग आणि सिंगापूरच्या धर्तीवर ‘रात्र बाजारपेठ’ सुरू करण्याचा प्रस्तावही पटलावर ठेवण्यात आला आहे. पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकात दम आणला आहे. त्यामुळे एकमेकांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये खो घालण्याचा प्रयत्न या पक्षांच्या नगरसेवकांकडून होण्याची शक्यता आहे. मात्र आपला प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी समान संख्याबळ असलेल्या उभय पक्षांना विरोधी पक्षांच्या मतावर अवलंबून राहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

कुरघोडी सुरूच...
- भाजपाचे सदस्य व विद्यमान आमदार अमित साटम यांनी मार्च २०१३मध्ये हा ठराव पालिकेच्या महासभेत मांडला होता. त्यानुसार मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने सिंगापूर व हाँगकाँगच्या धर्तीवर शनिवारी दुपारी २ ते रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठरावीक शुल्क आकारून रात्र बाजारपेठ सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार प्रशासनाने असा प्रस्तावच तयार करून विधी समितीपुढे आणला होता.

- पालिका निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपाला ८२ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेने अपक्ष नगरसेवकांच्या साथीने पालिकेत सत्ता स्थापन केली. तर भाजपाने सत्तेत किंवा विरोधात न बसता पहारेकऱ्याची भूमिका घेतली. यामुळे पालिकेच्या विविध समित्यांमध्ये सदस्यसंख्या समान आहे. यामुळे दोन्ही पक्ष विरोधी पक्षांच्या मदतीने एकमेकांची कोंडी करताना दिसत आहेत.
- गेल्या आठवड्यात स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आलेला सागवानी लाकडाच्या खुर्च्या-टेबल खरेदीच्या प्रस्तावाला भाजपाने विरोध केला. विरोधकांनीही त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. यामुळे सत्ताधारी शिवसेना एकाकी पडली होती.
- मिठी नदीच्या सफाईचे कंत्राट एमएमआरडीएने काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदाराला देण्यावरून शिवसेना आणि भाजपात जुंपली होती. अखेर या विषयावर मत घेतल्यानंतर शिवसेनेने मनसे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या मदतीने प्रस्ताव राखून ठेवला.

Web Title: Shiv Sena - Junket again in the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.